दिशा सालियन मृत्यू प्रकरणात राणे पिता-पुत्रांना अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मंजुर करण्यात आला आहे. दिशा सालियन मुत्यू प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राणे पिता- पुत्रा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिंडोशी सत्र न्यायालयाने काही अटी आणि शर्तींवर राणे पिता पुत्र यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.

दरम्यान अटकपूर्व जामीन मंजूर होताच आ. नितेश राणे यांनी म्हटलं, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मला… आम्हाला दोघांनाही दिशा सालियनच्या प्रकरणात आम्हाला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. हा जामीन काही अटी- शर्थींसह आहे. अद्याप अंतिम ऑर्डर हातात मिळालेली नाहीये पण अटी शर्थी टाकण्यात आल्या आहेत. मी न्यायलयाचे आभार मानतो की त्यांनी लोकशाहीत आम्हा लोकप्रतिनिधींना दिलेले अधिकार आहेत, कुणावरही अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधात आवाज  उठवणं हा आम्हाला अधिकार मिळाला आहे त्या अधिकाराला अबधित ठेवण्याचं काम न्यायलयाने केलं आहे.

पुढे बोलताना राणे म्हणतात, महाविकास आघाडी सरकारने जे काही षडयंत्र आमच्या विरोधात रचलं, जो काही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. दिशा सालियनच्या आई- वडीलांवर दबाव आणल्याचं आम्ही ऐकत आहोत. पण आता न्यायलयाने जो निर्णय दिला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. यापुढेही जिथे-जिथे अन्याय होत असेल तिथे आवाज उठवण्याचं काम आम्ही करणार आहोत.

काय आहे प्रकरण?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी १९ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेतली होती. त्या वेळी नितेश राणेही उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत दोघांनी दिशा सालियानच्या मृत्यूबाबत अनेक दावे केले होते. त्यानंतर दिशाची आई वासंती यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होते. दाखल तक्रारीच्या त्याआधारे मालवणी पोलिसांनी दिशाच्या पश्चात तिचे चारित्र्यहनन करणारी वक्तव्ये करुन तिची बदनामी केल्याप्रकरणी राणे पितापुत्रावर गुन्हा दाखल केला होता. त्यांनतर अटकेच्या भीतीने राणे पितापुत्रांनी दिंडोशी न्यायालयात धाव घेतली होती.

त्यांनी दाखल गुन्हासंदर्भात अटकपूर्व जामिनासाठी दिंडोशी न्यायालयात अर्ज केला होता. याबाबत कोर्टाने राणे पिता-पुत्राचा अर्ज मान्य करत त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच दोघांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन गुन्हा रद्द करण्यासाठीही याचिका केली आहे.

Share