रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे यांनी ‘महामिनिस्टर’ कार्यक्रमात जिंकली ११ लाखांची पैठणी

मुंबई : ‘झी मराठी’ वाहिनीवर गेल्या काही महिन्यांपासून रंगलेल्या ‘महामिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा अंतिम भाग काल रविवारी २६ जून रोजी प्रदर्शित झाला. या स्पर्धेची विजेती कोण ठरणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे या स्पर्धेत विजयी ठरल्या असून, त्यांनी ११ लाखांची पैठणी जिंकली आहे. लक्ष्मी ढेकणे यांनी सोन्याची जर असलेली आणि हिऱ्यांनी मढवलेली ही पैठणी जिंकल्यामुळे केवळ कोकणातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

 

लक्ष्मी ढेकणे यांचे माहेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी हे असून, त्यांचे सासर मुळचे लांजा तालुक्यातील शितोशी या ठिकाणी आहे. रत्नागिरी शहरात त्या गेली १४ वर्षे राहतात. त्या कृषी खात्यात सहाय्यक अधीक्षक म्हणून कार्यरत असून, रीतसर परवानगी काढून त्या ‘महामिनिस्टर’ या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘महामिनिस्टर’ या पर्वाच्या सुरुवातीपासूनच ११ लाखांच्या पैठणीची महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू होती. आदेश बांदेकर यांच्या खुमासदार सूत्रसंचालनामुळे या सोहळ्याची रंगत बरीच वाढली होती. सोन्याची जर असलेली आणि हिऱ्यांनी मढवलेली ही आकर्षक पैठणी कोणाला मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. ११ लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या १० शहरांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली होती.

शेवटच्या फेरीत ही महापैठणी रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे यांना मिळाली आहे. ११ लाखांची पैठणी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील १० शहरांमधील महिला सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये औरंगाबादच्या शरयू पाटील, पनवेलच्या सोनाली पाटील, ठाण्याच्या सुवर्ण पेंढारे, अहमदनगरच्या अपेक्षा पवार, नाशिकच्या डॉ. रुपाली पाखरे, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे, पुण्याच्या कावेरी मत्रे, कोल्हापूरच्या सलोनी येवलेकर, सोलापूरच्या सपना रंगदाळ, नागपूरच्या निवेदिता गुरुभेले या वहिनींनी आधी त्यांच्या शहरामध्ये १.२५ लाखाच्या पैठणीचा मान मिळवला. त्यानंतर याच १० महिलांमध्ये ११ लाखांच्या पैठणीसाठी जबरदस्त सामना रंगला.

रत्नागिरीतील ९० जणींमधून लक्ष्मी ढेकणे यांची निवड झाली होती. त्यावेळी त्यांनी सव्वा लाखाची पैठणी जिंकली होती. ‘महामिनिस्टर’ च्या महाअंतिम सोहळ्यात पोहोचलेल्या इतर केंद्रांवरील ९ जणींना हरवून लक्ष्मी ढेकणे यांनी ११ लाखांची महापैठणी जिंकली आहे. महाअंतिम सोहळ्यात विजेत्या लक्ष्मी ढेकणे यांच्या हाती महापैठणी देऊन या पर्वाचा शेवट करण्यात आला. ११ लाखांची महापैठणी जिंकल्यानंतर लक्ष्मी ढेकणे यांचा आनंद गगनात मावत नव्हता. या स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यानंतर त्या म्हणाल्या, मला विश्वासच बसत नव्हता की, मला हा मान मिळाला आहे. आम्ही १० जणी होतो, त्या १० जणी उत्कृष्ट खेळूनच पुढे आल्या होत्या. सगळ्या खूप छान खेळणाऱ्या होत्या. त्यामुळे मला महापैठणी मिळाल्यानंतर फार विशेष वाटले.

आदेश बांदेकर यांच्याविषयी त्या म्हणाल्या, आदेश बांदेकर यांच्यासह स्टेजवर जाणे हेच आमच्यासाठी फार मोठे होते. ते खूप मोठे कलाकार आहेत. त्यांच्यासोबत स्टेजवर गेल्यानंतर ते कायम हसवायचे. त्यांच्या आईचे माहेर सावंतवाडी असल्याने गप्पा मारताना त्यांनी सावंतवाडीची सैर घडवून आणली.

Share