निष्ठेने राहिलात, तुमच्यामुळे शिवसेनेला बळ मिळाले! उद्धव ठाकरेंचं आमदारांना भावनिक पत्र

मुंबई : शिवसेनेत बंडखोरीमुळे मोठे खिंडार पडले आहे. पण या बंडखोरीमध्ये काही आमदार हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निष्ठा दाखवत संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल निष्ठावान शिवसेनेच्या १५ आमदारांना धन्यवाद व्यक्त करणारे भावनिक पत्र पाठवले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रात म्हटलं आहे की, जय महाराष्ट्र! शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपले सर्वस्व आहे. निष्ठा आणि अस्मितेची महती शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करू नका, हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय आहे.

शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या, प्रलोभनांना बळी न पडता आपण शिवसेनेसोबत राहिलात आपल्या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला आणि शिवसेनेला बळ मिळाले. आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो, असे या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, ४० आमदारांनी बंड केल्यानंतरही आदित्य ठाकरे यांच्यासह वैभव नाईक, राजन साळवी, भास्कर जाधव, सुनील प्रभू, अजय चौधरी, सुनील राऊत, रमेश कोरगावकर, रवींद्र वायकर, उदयसिंह राजपूत, संजय पोतनीस, प्रकाश फातर्पेकर, नितीन देशमुख, कैलास पाटील आणि राहुल पाटील हे आमदार उद्धव ठाकरेंसोबत आहेत.

Share