बंगळुरू : सध्या देशात हनुमान चालिसा, भोंगा, ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरू असतानाच आता कर्नाटकातील मलाली येथील जुमा मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने या भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
कर्नाटकातील मंगळुरूपासून काही अंतरावर मलाली येथील जुमा मशिदीच्या डागडुजीचे काम सुरू आहे. २१ एप्रिल रोजी डागडुजीदरम्यान मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडले. हे अवशेष सापडल्यामुळे पूर्वी या ठिकाणी हिंदू मंदिर होते, असा दावा केला जात आहे. विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) नेत्यांनी जिल्हा प्रशासनाकडे यासंदर्भात धाव घेतली असून, कागदोपत्री सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय या ठिकाणचे डागडुजीचे काम थांबवण्यात यावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
आता हा वाद न्यायालयामध्ये पोहोचला असून न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत डागडुजीचे काम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडल्यापासून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झाले आहेत. दरम्यान, विहिंप आणि बजरंग दलाच्या मागणीनंतर प्रशासनाने तातडीने या जमिनीसंदर्भातील कागदोपत्री पडताळणी सुरू केली असून, लोकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. जमिनीची नोंद ठेवणारा विभाग आणि वफ्फ बोर्डाकडून माहिती घेणार आहोत, असे दक्षिण कानडाचे उपायुक्त राजेंद्र के. व्ही. यांनी सांगितले.