मुंबई : दहीहंडीतील गोविंदाना खेळाडू कोट्यातून ५ टक्के आरक्षण देण्याचा बुलेट ट्रेनच्या वेगाने घेतलेला निर्णय हा आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठीच घेतल्याची दाट शंका येते, असे मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, दहीहंडी पथकातील गोविंदाना खेळाडू कोट्यातून ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय बुलेट ट्रेनच्या वेगानं घेतला आहे. हा निर्णय आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठीच घेतला असावा, अशी दाट शंका येते. याबाबत अनेक विद्यार्थी आणि खेळाडूंनी फोन करुन त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवल्याचंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दहीहंडीतील गोविंदाना खेळाडू कोट्यातून ५ टक्के आरक्षण देण्याचा बुलेट ट्रेनच्या वेगाने घेतलेला निर्णय हा आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठीच घेतल्याची दाट शंका येते. याबाबत अनेक विद्यार्थी आणि खेळाडूंनी फोन करुन त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 20, 2022
अन्य एक ट्वीट करत त्यांनी म्हटलं की, राज्य सरकारच्या या निर्णयाला आमचा विरोध नाही. मात्र, कुठलाही निर्णय व्यापक विचारानंतर घ्यायला हवा. एवढ्याच सुपर फास्ट गतीने निर्णय घ्यायचे असतील तर खेळाडूंच्या नियुक्त्या, नोकरभरती यासंदर्भातील निर्णय घ्यावेत. पण युवकांच्या भविष्याशी निगडीत विषयांबाबत राजकारण होऊ नये, ही अपेक्षा. असं म्हणत रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर टीका केली आहे.
नेमका काय आहे निर्णय?
दहीहंडी उत्सवाच्या एक दिवस आधी राज्य सरकाने विधिमंडळात प्रस्ताव मांडून दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश केला. त्यामुळे राज्यातील इतर मान्यताप्राप्त खेळांप्रमाणेच दहीहंडीतील गोविंदांना देखील खेळाडू म्हणून सरकारी नोकऱ्यांमधील ५ टक्के आरक्षणाच्या कोट्याचा लाभ मिळू शकणार आहे. मात्र, यावर एमपीएससी परीक्षार्थींसोबत विरोधकांनी देखील आक्षेप घेतला आहे.