संभाजीराजे छत्रपतींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, म्हणाले…

मुंबई : किल्ले रायगडवर पिंडदान करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर या घटनेनंतर संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान या सर्व घटनेनंतर संभाजी राजे छत्रपती यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं असून महाराजांना अभिवादन करण्याव्यतिरिक्त अन्य विधीस परवानगी नसावी अशी मागणी केली आहे.

संभाजीराजे छत्रपतींचं पत्र
“दुर्गराज रायगडवर श्री शिवछत्रपती महाराजांच्या समाधीस्थळी जो प्रकार घडला व गेल्या काही महिन्यांत काही लोकांनी संशयास्पद विधी केल्याचे आढळून आले आहे, याला अटकाव घालण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात,” यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यांना पत्र लिहिल्याचं संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलं आहे. ट्विटरला त्यांनी हे पत्र शेअर केलं आहे.

संभाजी राजे छत्रपती यांनी पत्रात म्हटलं की, समस्त देशाचे शक्तीस्थळ असलेल्या दुर्गराज रायगडावर गेल्या काही महिन्यात श्री शिवछत्रपती महाराजांना अभिवादन करण्याव्यतिरिक्त इतर काही संशयासप्द विधी केल्याचे आढळून येत आहे. अशा प्रकारामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जाऊन असंतोषाचे वातावरण निर्माण होऊ शकते. याकरिता, संपूर्ण दुर्गराज रायडावर व विशेषत: राजसदर, शिवसमाधी परिसर, होळीचा माळ, बालेकिल्ला परिसर याठिकाणी श्री शिवछत्रपती महाराजांना अभिवादन करण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचे विधी करण्यास अटकाव करण्यात यावा. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गृहविभाग व केंद्रीय पुरातत्व विभागास आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात व तात्काळ व्यवस्था अंमलात आणावी.

काय आहे प्रकार..

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून, ज्यात रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर पिंडदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. शिवरायांच्या  समाधी जवळच्या एका कोपऱ्यात पिंडदानाचा कार्यक्रम सुरु असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. याबाबत माहिती मिळताच शिवप्रेमींना धाव घेत हा कार्यक्रम रोखला. मात्र एबीपी माझा या व्हीडिओची पुष्टी करत नाही.

Share