समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ; ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणेः  एनसीबी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. समीर वानखेडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळवला असल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कोपरी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली. समीर वानखेडे यांनी खोटी माहिती देऊन मद्य विक्रीचा परवाना मिळवला असल्याची तक्रार पोलिसांना देण्यात आली आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी २ फेब्रुवारीला समीर वानखेडेंच्या मालकीच्या सद्गुरु बार आणि रेस्तराँचा परवाना रद्द केला आहे. विशेष म्हणजे नवाब मलिक यांनी यासंदर्भात तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. वानखेडे यांनी आपले वय चुकीचे दाखवल्याचा ठपका ठेवत हा परवाना रद्द करण्यात आला होता.

समीर वानखेडे यांच्या नावे बार आणि रेस्तराँचा जो परवाना होता ते सद्गुरु बार आणि रेस्तराँ नवी मुंबईमधील वाशी येथे आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार वाशीमधील सद्गुरु हॉटेलचा परवाना वानखेडे यांच्या नावे होता. हा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ रोजी जारी करण्यात आला आहे. तसेच मध्यंतरी हा परवाना रिन्यू करण्यात आला होता. आता परवाना रद्द केला असला तरी तो ३१ मार्च २०२२ पर्यंतच पात्र होता. म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिने आधीच परवाना रद्द केला असून आता या कारवाईमुळे परवाना रिन्यू करता येणार नाही. या बारमध्ये परदेशी तसेच भारतीय बनावटीच्या दारुची विक्री करण्यास परवानगी देण्यासंदर्भातील हा परवाना होता.

नवाब मलिक यांनी केला होता आरोप
क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. समीर वानखेडे यांच्याविरोधात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी केलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले होते. एका पत्रकार परिषदेत मलिक यांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधला होता. अवघ्या १७ व्या वर्षी समीर वानखेडेंना बारचा परवाना मिळाल्याचे त्यांनी म्हटले होते. ज्यावेळी परवाना मिळाला त्यावेळी वानखेडेंचे वय हे अवघे १७ वर्षांचे होते. त्यामुळे १७व्या वर्षी वानखेडेंना बारचा परवाना कसा मिळाला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.

समिर वानखेडे यांचे मत
मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर वानखेडेंनी यावर स्पष्टीकरण दिले होते. वानखेडे यांनी आपण भारतीय महसूल सेवेमध्ये (आयआरएस) रुजू झाल्यापासून हा परवाना आपल्या नावे असल्याचे स्पष्ट केले होते. या परवान्यासंदर्भातील कायदेशीर हक्क हे समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे देण्यात आले होते. “यात बेकायदेशीर असे काहीच नाहीय. मी सेवेमध्ये रुजू झालोय तेव्हापासून म्हणजेच २००६ सालापासून या बार आणि रेस्तराँरंटचा उल्लेख माझ्या वार्षिक स्थावर मालमत्तेमध्ये करत आहे. तसेच या परवान्याबद्दलचाही उल्लेख मी संपत्तीच्या हिशोबात मांडलाय. या उद्योगामधून मिळणाऱ्या कामाईचा सर्व उल्लेख मी प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केलाय,” असे वानखेडे म्हणाले होते. मात्र वयाच्या मुद्द्यावरुन हा परवाना रद्द करण्यात आला होता.

Share