संजय राठोडांना पुन्हा मंत्रीपद, चित्रा वाघ म्हणतात ‘लडेंगे….जितेंगे’

मुंबई : शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. पहिल्या टप्प्यात १८ आमदारांना शपथ घेतली. राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यामध्ये पूजा चव्हाण प्रकरणातील वादग्रस्त शिवसेना आमदार संजय राठोड यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भापच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांना मंत्रीपद देणं दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट मध्ये म्हटलं की, पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं, हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे”, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

काय आहे पूजा चव्हाण प्रकरण?
बीडमधील परळी येथील टिक टॉक स्टार पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केलेली. तिनं पुण्यात आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडालेली. तेव्हा तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आलेले होते. या आरोपानंतर संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. यावेळी पूजा चव्हाणच्या कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल झाल्या होत्या. त्यातील आवाज संजय राठोड यांचा असल्याचा आरोप केला जात होता. यानंतर संजय राठोड कुटुंबासह नॉट रिचेबल झालेले. काही काळानंतर ते पुन्हा बंजारा समाजातील कार्यक्रमांमध्ये सक्रिय झाले. अखेरीस पुण्यातील वानवडी पोलिसांनी पूजा चव्हाण हिचा मृत्यू घातपात नसल्याचा खुलासा केला होता. पुजाचा अपघाती मृत्यू झाला असल्याचा खुलासा पोलिसांनी केल्यानंतर संजय राठोड यांना दिलासा मिळाला होता.

Share