पुणे : यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेला वाफगावचा किल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात ठेवला असून, हा किल्ला सरकारने ताब्यात घेऊन त्याचे संवर्धन करावे, अशी मागणी भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. करायचं एक अन दाखवायचं एक, अशी पवारांची प्रवृत्ती आहे. ते नेहमीच दुट्टपी भूमिका घेतात, अशी टीकाही त्यांनी केली.
वाफगावचा किल्ला राज्य सरकारने ताब्यात घ्यावा आणि त्यांचे संवर्धन करावे, या मागणीसाठी यशवंत ब्रिगेडच्या वतीने आज पुण्यात आंदोलन करण्यात आले.
त्या आंदोलनात गोपीचंद पडळकर यांनी भेट दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. आ. पडळकर म्हणाले, शरद पवारांना बहुजनांचा इतिहास मोडीत काढायचा आहे. समाजाचा विरोध असतानाही पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्यांचे उद्घाटन त्यांनी केले. महाराज यशवंतराव होळकरांचा जन्मस्थान असलेला वाफगावचा किल्ला त्यांनी ताब्यात ठेवला आहे. शरद पवार जेजुरीत जातात; पण वाफगावच्या किल्ल्याबद्दल काहीच बोलत नाहीत. आता किल्ला राज्य सरकारच्या ताब्यात द्या, अन्यथा आम्ही हा किल्ला ताब्यात घेऊन लोकवर्गणीतून किल्ल्याचा जीर्णोद्धार करू, असा इशारा आ. पडळकरांनी दिला आहे. थोरले सुभेदार मल्हारराव होळकरांनी ती वास्तू बांधली आहे. या वास्तूमध्ये इंग्रजांना सलग २५ वर्षे हरवणाऱ्या यशवंत होळकरांचा जन्म झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या भावना त्या किल्ल्याप्रती खूप भावनिक असल्याने तो किल्ला ताब्यात का घेतला जात नाही, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राज्य सरकारकडून खोटे सांगितले जात आहे. २०१९ च्या जाहीरनाम्यात राष्ट्रवादीने एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाचा मुद्दा मांडला होता. विश्वासघाताने सरकार आल्यानंतर कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात शरद पवारांनी याबाबत सांगितले होते. तसेच शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचे आम्ही समर्थन करीत नाहीत; परंतु पवारांची भूमिका दुटप्पी आहे. माझ्या गाडीवर हल्ला होतो. तेव्हा त्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर तुम्ही हात ठेवतात. कर्मचारी तुमच्या घराकडे चालून आले. त्याचा तुम्ही का अभ्यास केला नाही, असा थेट सवाल आ. पडळकरांनी शरद पवारांना विचारला.