शिंदे, राणे भुजबळांच्या बंडाशी माझी तुलना करू नका – राज ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. मुंबईत आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडत आहे. यात राज ठाकरेंनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर सडकून टीका केली. गेली दोन अडीच वर्षे जे चालू आहे ती महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट नाही, असे राज ठाकरे म्हणाले, तसेच शिवसेना सोडताना घडामोडी आणि बाळासाहेबांच्या घेतलेल्या भेटीबाबत राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले.

राज ठाकरे म्हणाले, काही दिवसांपूर्वी एका चॅनेलला मुलाखतीत मला प्रश्न विचारला गेला, शिवसेनेतून भुजबळ बाहेर पडले, राणे बाहेर पडले, तुम्ही बाहेर पडलात. तेव्हा मी म्हणालो की हे सर्वजण बाहेर पडले ते दुसऱ्या पक्षात सत्तेमध्ये गेले. मी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष उभा केला.

मी बाळासाहेबांना सांगून शिवसेनेतून बाहेर पडलो. शिवसेनेतून बाहेर पडतोय हे सांगण्यासाठी मी बाळासाहेबांकडे गेलो होतो, तेव्हा तिथे मनोहर जोशी उपस्थित होते. ते खोलीच्या बाहेर गेले. मनोहर जोशी बाहेर गेल्यानंतर तिथे मी आणि बाळासाहेब ठाकरे असे दोघेच होतो. तेव्हा बाळासाहेबांनी हात पसरले. मला मिठीत घेतले आणि म्हणाले की आता जा. मी दगाफटका करून बाहेर पडलो नाही. तुमच्या विश्वासावर बाहेर पडलो. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला, असे राज ठाकरे म्हणाले.

Share