मुंबई : ईडी सरकारमधील मंत्र्यांनी काल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. हे दर्शन आस्थेपोटी घेतले असते तर त्यांनी शिवसेना फोडली नसती. शिवसेनेत बंड करायाचे आणि आस्था आमची बाळासाहेबांशी आहे हे दाखवायचं यामध्ये आस्था किती आणि लालसा किती हे राज्यातील जनतेला कळून चुकलं आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे काॅँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळापासून काही अंतरावर आहे. पंरतू ज्या लोकांकडून भारतीय राज्यघटनेची पायमल्ली केली गेली आहे त्यांच्याकडून स्मारकाचे दर्शन घेतले जाईल का हा विचार करणंच चुकीचं आहे. ज्यांना घटनाच मान्य नाही ते डाॅ बाबासाहेबांचा काय आदर करणार आहेत, असा खोचक टोलाही तपासेंनी लगावला आहे.
ईडी सरकारमधील मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाती असणार याची स्पष्टता दिसत नाही. शिंदे गटावर भाजपचा दबाव असल्याने शिंदे गटाला दुय्यम दर्जाची खाती देऊन भाजप आपल्याकडे वजनदार खाली ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे गटात सध्या चढाओढ सुरु असून एकवाक्यता नसल्याने हे सरकार अधिवेशनाला कसे सामोरे जाणार हा खर प्रश्न आहे, असेही महेश तपासे म्हणाले.