भाजपाच्या ‘आराध्य दैवतां’कडून शिवरायांचा अपमान – संजय राऊत

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की ,छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीने सातत्याने अपमान, आमच्या आरध्य दैवतांचा अपमान भाजपाच्या आराध्य दैवतांकडून म्हणजेच राज्यपाल कोश्यारी त्यांचे राष्ट्रीय प्रवक्त्यांकडून होत आहे. त्यांना वाटत असेल की हे जे राजकारण सुरू आहे त्या पद्धतीने हा विषय सुद्धा आम्ही बाजूला करू. महाराष्ट्रावर कर्नाटककडून जो अन्याय होतोय. विरोधी पक्ष एकत्र आलेला आहे. तुम्ही म्हणाल कधी, कोणत्या क्षणी? कोणत्याही क्षणी जो अॅक्शन प्लॅन आहे त्या संदर्भात व्यवस्थित हालचाली सुरू आहेत.

याशिवाय आम्ही वाट बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा अपमान होऊन सुद्धा हे सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, आमदार जे स्वाभिमानाच्या गोष्टी करून पक्ष सोडून गेले ते आमदार हे अजुन हात चोळत कसे बसले आहेत, किती वेळ बसणार आहेत हात चोळत, तोंड शिवून? हे आम्ही पाहतो आहोत, महाराष्ट्राला आम्ही दाखवतो आहोत. की बघा हा त्यांचा स्वाभिमान, हा त्यांचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर हे सरकार आणि त्यांचे आमदार हे मुठी आवळून उसळून उभे राहत नाहीत. या लोकांना शिवसेना फोडली कारण शिवसेनेला महाराष्ट्राचा अभिमान आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जी पावलं उचलायची आहेत, ती आम्ही उचलतोच आहोत. असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

नेहरूंनीदेखील माफी मागितली
पंडित नेहरूंकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून अपमान झाला तेव्हा त्यांनी माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत बोलण्यात आणि लिखाणात चूक झाली असे लक्षात आल्यानंतरही त्यांनी पंतप्रधानपदी असलेल्या पंडित नेहरू यांनी माफी मागितली. मोरारजी देसाई यांचे महाराष्ट्राबाबत काही मतभेद, वादाचे मुद्दे असतील. पण, त्यांच्याकडूनही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य गेल्यानंतर त्यांनीदेखील माफी मागितली होती. पण भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जात आहे आणि उलट शहाणपण शिकवत आहेत, हे महाराष्ट्र पाहत असल्याचे राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्र संतापला असून असंतोष निर्माण झाला आहे. वेळ आल्यावर याची प्रचिती दिसून येईल असा इशाराही त्यांनी दिला.

Share