गुवाहटी : मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरेंनी काल शिवसेना बंडखोर आमदारांना शिवसेना आणि ठाकरे नाव न वापरता जगून दाखवा, असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर आता आज एकनाथ शिंदे गटाचं नाव समोर आलं आहे. शिवसेना- बाळासाहेब ठाकरे असं नाव शिंदे गटानं निश्चित केलं आहे. याबद्दलची घोषणा आज संध्याकाळी होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांचा गट वारंवार खरी शिवसेना आमची असल्याचं म्हणत आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये गेल्यानंतर त्यांनी हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड केली. यानंतर खरी शिवसेना कोणाची, असा प्रश्न उपस्थित होतो. आज संध्याकाळी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, असं या नव्या गटाचं नाव असणार आहे. पक्ष कोणाचा ही लढाई यामुळे होणार असं स्पष्ट झालं आहे.
शिंदे यांच्या गटाच्या नावात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांचंही नाव आल्याने सेनेच्या गोटात नाराजी वाढली आहे. शिवसैनिकांनी ठिकठिकाणी बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर तोडफोड करायला सुरुवात केली आहे. आता शिवसेनेवर अधिकार कोणाचा असा प्रश्न उपस्थित होतोय.