मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर ईडीने ताब्यात घेतले आहे. आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास ईडीच्या पथकाने राऊत यांच्या घरी छापा टाकला होता. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून संजय राऊतांची ९ तास चौकशी करण्यात आली. पत्राचाळ व्यवहारात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप राऊंतांवर करण्यात आला होता. राऊत ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सहकार्य करत नव्हते, अशीही माहिती समोर आली आहे.
दरम्यान,संजय राऊत यांची गेल्या १० तासांपासून ईडीकडून चौकशी सुरु आहे. पत्राचाळा घोटाळाप्रकरणी ही चौकशी सुरु असल्याची माहिती आहे. ईडीच्या ७ अधिकाऱ्यांकडून राऊतांच्या घरी झाडाझडती सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. राऊतांच्या खोलीमधील कागदपत्रं आणि दस्ताऐवज ईडीकडून तपासले जात आहेत. याशिवाय राऊत यांच्या दादर इथल्या गार्डन कोर्ट इमारतीमधील फ्लॅटवरही ईडीकडून झाडाझडती सुरु आहे. या दरम्यान, ईडीच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली.
काय आहे पत्राचाळ घोटाळा?
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे तीन हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर २०११, २०१२ आणि २०१३ मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. पत्राचाळ जमीन घोटाळा हा १,०३४ कोटी रुपयांचा असल्याचा संशय ईडीला आहे.