औरंगाबाद : शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांनी भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्यावरुन जाहीर माफी मागावी लागली आहे.’आमचे हिंदूत्व शेंडी जाणव्याचे नाही’ असे वादग्रस्त विधान विनायक राऊतांनी केले होते. त्यामुळे संपूर्ण ब्राम्हण समाज आक्रमक झाला होता. या सर्व प्रकरणी राऊत यांनी आज औरंगाबाद इथे ब्राह्मण समाजाची भेट घेत, आपण केलेल्या वक्तव्याची माफी मागितली आहे.
औरंगाबाद येथे २३ मार्चला एका भाषणात राऊत यांनी “आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही’, हे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे राज्यभरातील ब्राह्मण समाजाने आक्रमक भूमिका घेत खासदार राऊत यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज राऊत यांनी औरंगाबाद येथील ब्राह्मण समाजाच्या सदस्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, काही कळत नकळत माझ्या तोंडून उद्गार निघाले. त्यात कोणाचाही अनादर करणे हा उद्देश नव्हता. मी आज नतमस्तक आणि माफी मागायला आलो. ब्राह्मण समाजाची माफी मागून त्यांनी कृपा आशीर्वाद कायम ठेवा असे म्हटले आहे. तर काही चूक झाली असेल तर माफ करा असंही राऊत यांनी म्हटलं आहे.