मुंबई : मी स्वत: ५२ वर्ष शिवसेनेला वाहून दिले होते. आमच्या डोळ्यादेखत पक्ष पत्ताच्या बंगल्यासारखा कोसळत आहे. हे सगळं पाहावत नाही. बाळासाहेब आजही माझ्यासमोर आहे, त्यामुळे आज वाईट वाटत आहे’ असं म्हणत शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा देणारे रामदास कदम ढसाढसा रडले. रामदास कदम यांनी आपल्या शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रामदास कदम यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
५२ वर्षे मी कामं केलं पण माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आयुष्याची संध्याकाळ अंधारमय होईल असं कधीच वाटलं नव्हतं हे सांगताना रामदास कदम अत्यंत भावूक झालेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी शरद पवारांवर देखील जोरदार निशाणा साधला. शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला. मी खूप अस्वस्थ आहे. मी राजीनामा दिल्याने मी समाधानी नाही, आनंदी नाही. ५२ वर्षे लढणारा नेता राजीनामा का देतो? याचा विचार करायला हवा. दु:ख होतं वेदना होतात. मी प्रामाणिकपणे हात जोडून आपण राष्ट्रवादीसोबत बसू नका असं सांगितलं होतं.
उद्धव ठाकरे जेव्हा आजारी होते तेव्हा शरद पवारांनी कोकणात पक्ष फोडण्याचे काम केलं त्याचे पुरावे दाखवले होते पण उद्धव ठाकरेंनी दुर्लक्ष केलं असा आरोप कदम यांनी यावेळी केला.बाळासाहेबांनी पवारांसोबत उद्धव यांना जाऊ दिलं असत का? पक्षापेक्षा उद्धव ठाकरेंनी शरद पवार मोठे वाटतात का? असे सवाल उपस्थित करत शिवसेना संपवण्याचे काम पवार काका पुतण्यांनी केलं असा आरोप रामदार कदम यांनी केला.
तसेच, हे सरकार पाच वर्ष चालल असत तर शिवसेना संपली असती. बाळासाहेबांनी हिंदुत्व वाढवलं. ही बाळासाहेबांची शिवसेनाची नाही, शरद पवारांनी डाव साधला, उद्धव ठाकरे भोळे आहेत. त्यांना पवारांचा डाव कळला नाही. शरद पवारांनी पक्ष फोडला. असा आरोप कदम यांनी केला. पुष्कळ विचार केल्यानंतर सेना सोडण्याचा निर्णय घेतला. असे सांगत उद्धव ठाकरे यांनी ६ महिने वेळ दिला नाही आणि आता सभा घेत आहेत. अशी खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केला.