श्रीकांत शिंदेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून कारभार? राष्ट्रवादी काँग्रेसचा गंभीर आरोप

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसून राज्य चालवत आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. याबाबत एक फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी ट्विट केला आहे.

रविकांत वरपे आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, खासदार श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर? असे रविकांत वरपे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

दरम्यान, श्रीकांत शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांचे खुर्चीत बसले असतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. यावरुन अनेकजण राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहेत. मात्र, हे छायाचित्र वर्षा बंगल्यावरच टिपण्यात आलेले आहे किंवा नाही, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा होऊ शकलेला नाही.

Share