पुणे : आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील विहिरीत पाय घसरून पडल्याने एका सहा वर्षीय चिमुकलीचा बुडून मृत्यू झाला. मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीची ६ वर्षीय लहान मुलगी खेळताना पाय घसरून ५० फूट खोल विहिरीत पडली. तब्बल २८ तासांनी या मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.
जिजाबाई संतोष दगडे (वय ६ वर्षे) असे विहिरीत बुडून मृत झालेल्या लहान मुलीचे नाव असून, रविवारी रात्री तिचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात यश आले. निरगुडसर येथील बाम्हणदरा येथील जारकरवाडी ते मेंगडेवाडी मंचर रस्त्याच्या बाजूला ओढ्याच्या कडेला शेतकरी सुरेश किरवे यांच्या मालकीची विहीर आहे. शनिवारी (४ जून) मेंढपाळ संतोष लालू दगडे यांची मेंढरे ओढ्यावरील पाणी पिण्यासाठी आली. पाणी पिल्यानंतर मेंढ्या झाडाच्या सावलीत बसल्या होत्या. मुलीचे वडील गावात गेले होते. झाडाखाली त्यांची मुलगी जिजाबाई दगडे आणि मुलीची आजी सुमनबाई लालू दगडे या दोघीच होत्या. सुमनबाई यांना झोप लागली असल्याने जिजाबाई दगडे ही झाडाखाली खेळत असताना खेळता खेळता शेजारील विहिरीकडे गेली असता तिचा तोल गेला आणि ती ५० फूट खोल विहिरीमध्ये पडली. शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मुलगी जिजाबाई दगडे दिसत नसल्याने तिचा सगळीकडे शोध घेतला. मात्र, ती आढळून आली नाही. मुलीचे वडील संतोष दगडे यांनी मुलगी बेपत्ता झाली असल्याची फिर्याद मंचर पोलिस ठाण्यात दिली होती. सदर मुलगी विहिरीत पडली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. रविवारी सकाळी मेंढपाळ आणि ग्रामस्थांनी विहिरीमध्ये शोध घेतला असता मुलीची ओढणी पाण्यात तरंगताना आढळून आली. निरगुडसर येथील स्थानिक ग्रामस्थ, तरुण यांनी शोधाशोध केली असता ती सापडली नाही. त्यानंतर जुन्नर येथील आपत्कालीन व्यवस्थापन टीमला बोलावण्यात आले. रविवारी रात्री मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आपत्कालीन व्यवस्थापन टीमला यश आले.