मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे गेली नऊ दिवस चाललेल्या सत्ता संघर्षानंतर अखेर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यादरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्या. काल गुरुवारी (३० जून) एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. त्यानंतर नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता प्रसाद ओक यानेही एकनाथ शिंदे यांना खास शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून आणि सर्वसामान्य जनतेकडून शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट गेल्या १३ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने महाराष्ट्रात आनंद दिघे नावाच्या वादळाची पुन्हा आठवण करून दिली. आनंद दिघे यांच्यासोबत एक व्यक्ती या चित्रपटात महत्त्वाची ठरली ती म्हणजे एकनाथ शिंदे. आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यात गुरु-शिष्याचे नाते होते. आनंद दिघे यांनीच एकनाथ शिंदे यांना राजकारणात पुढे आणले. आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेना बळकट करून आपले वर्चस्व निर्माण केले. सामान्य रिक्षाचालक ते नगरसेवक, महापालिका सभागृह नेता, आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री असा एकनाथ शिंदे यांचा लक्षवेधी जीवनप्रवास आहे.
असे म्हणतात की, ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट आनंद दिघे यांचा होता तितकाच एकनाथ शिंदे यांचा होता. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने साकारली होती. त्यामुळे प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांचे विशेष नाते आहे. ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट सुपरहिट झाला. जेव्हा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला होता तेव्हा प्रसाद ओक सगळ्यांसमोर आला, तेव्हा कोणाच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्याचे गेटअप अगदी आनंद दिघे यांच्यासारखे होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी तर प्रसाद ओकला वाकून नमस्कार केला होता. शिंदे यांनी प्रसादच्या भूमिकेचे खूप कौतुक केले. या चित्रपटातील दुसरी महत्त्वाची अर्थात एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितीश दाते या कलाकाराने साकारली आहे. या चित्रपटासाठी तसेच प्रसादच्या भूमिकेसाठी एकनाथ शिंदे यांचा मोलाचा वाटा होता. प्रसाद ओक आणि एकनाथ शिंदे यांचे फार चांगले संबंध आहेत. त्यामुळेच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच प्रसाद ओकने त्यांना शुभेच्छा देत खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CfbrZnctZrf/?utm_source=ig_web_copy_link
प्रसाद ओक याने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्याने दोन खास फोटोदेखील शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओकने एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे. हा फोटो ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगदरम्यानचा आहे, तर दुसरा फोटो हा ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटातील आहे. यात एकनाथ शिंदे हे एका मंदिरात देवासमोर हात जोडून उभे असल्याचे दिसत आहे. “मा. मुख्यमंत्री…श्री एकनाथजी शिंदे साहेब… मनःपूर्वक अभिनंदन आणि कोटी कोटी शुभेच्छा…!!!”, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोला दिले आहे. त्याचा हा फोटो आणि पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
दरम्यान, चित्रपट दिग्दर्शक विजू माने यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ‘ठाणे जिल्ह्याचे पहिले मुख्यमंत्री… एकनाथजी शिंदे… लई अभिमान..’ असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे.