पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देणार खास डिझाईन केलेली ‘तुकाराम पगडी’

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या मंगळवारी (१४ जून) देहू दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते श्रीक्षेत्र देहू येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. याप्रसंगी पंतप्रधानांना खास डिझाईन केलेली रेशमी ‘तुकाराम पगडी’ आणि उपरणे भेट म्हणून देण्यात येणार आहे.

डोईवर मध्यभागी विठ्ठलाची प्रतिमा, ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ हा बुक्क्याने लिहिलेला अभंग, तुळशीच्या मण्यांनी केलेली बांधणी, टाळ, चिपळ्या अशा वारकरी संप्रदायाच्या प्रतीकांचा वापर करून ही आगळीवेगळी ‘तुकाराम पगडी’ तयार करण्यात आली आहे. देहू संस्थानच्या विश्वस्तांच्या विनंतीनुसार पुण्यातील सुप्रसिद्ध मुरूडकर झेंडेवाले यांनी ही ‘तुकाराम पगडी’ साकारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (१४ जून) देहू येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. त्यावेळी त्यांचे ‘तुकाराम पगडी’ आणि अभंग लिहिलेले उपरणे देऊन स्वागत करण्यात येणार आहे. ही पगडी रविवारी (१२ जून) देहू संस्थानच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली जाणार आहे. या पगडीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

आषाढी वारीसाठी २० जूनला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरला प्रस्थान
दरम्यान, आषाढी वारीसाठी येत्या २० जूनपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होणार आहे. २० जूनला देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरला प्रस्थान होईल. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे हा सोहळा स्थगित करण्यात आला होता. यंदा हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे. तसेच या सोहळ्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूला भेट देणार असल्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देहू संस्थान आणि प्रशासनामार्फत जय्यत तयारी करण्यात आली आहे.

अशी आहे ‘तुकाराम पगडी’

‘तुकाराम पगडी’ विषयी माहिती देताना गिरीश मुरुडकर म्हणाले, जगद्गुरू संत तुकाराम महाराज वापरत होते तशा स्वरूपाची या पगडीची रचना करण्यात आली आहे. बदामी रंगाच्या रेशमी वस्त्राची तुळशीच्या मण्यांचा वापर करून ही पगडी बांधण्यात आली आहे. पगडीच्या मध्यभागी बुक्क्याचा वापर करून विठ्ठलाची प्रतिमा साकारण्यात आली आहे. ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी’ हा अभंग सुलेखनाद्वारे पगडीवर रेखाटला आहे. ही पगडी पंतप्रधानांच्या मस्तकावर ठेवण्यात येईल तेव्हा चंदन आणि बुक्क्याचा टिळा आपोआप येईल अशी रचना करण्यात आली आहे. पगडीच्या कानापाशी उजव्या बाजूला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि डाव्या बाजूला जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा दिसतील. सजावट करताना दोन्ही बाजूला लोडवर चिपळी आणि टाळ ही प्रतीके ठेवण्यात आली आहेत. उपरण्यावर दोन्ही बाजूला संत तुकाराम महाराजांचा मराठी आणि हिंदी अभंग सुलेखनाद्वारे कोरण्यात आला आहे. आजवर आमच्यामार्फत अनेक राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि कला क्षेत्रातील मान्यवर मंडळीसाठी पगडी, फेटे तयार करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Share