लष्करात व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून हेरगिरी

नवी दिल्ली : संपर्काचे प्रभावी माध्यम बनलेल्या व्हॉटस्ॲपचा गैरवापरही होत असल्याचे समोर येत आहे. लष्करात व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून हेरगिरी केल्याचे धक्कादायक एक प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. सदर प्रकरणाच्या अनुषंगाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या हेरगिरीच्या प्रकरणात शेजारी देशाचा संबंध आढळून येत असल्याने हे प्रकरण गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे सैन्यदलातील काही अधिकार्‍यांनीच सायबर सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा संशय आहे.

काही अधिकार्‍यांकडून सायबर सुरक्षेचे उल्लंघन होत असल्याची शंका सैन्य आणि गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली होती. त्यानंतर या प्रकरणाची ताबडतोब चौकशी करून अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. संबंधित अधिकार्‍यांवरील आरोप सिध्द झाले तर त्यांच्याविरोधात कठोरातील कठोर कारवाई केली जाऊ शकते, असे सूत्रांनी नमूद केले. एकूण प्रकरण लष्कराशी संबंधित असल्याने यासंदर्भात सावधानता बाळगली जात आहे.

पाकिस्‍तानसह चिनी हेरांचे जाळे
मागील काही काळापासून पाकिस्तानी आणि चिनी हेर भारतीय लष्करातील अधिकार्‍यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. लष्करातील संवेदनशील माहिती जमा करण्याच्या उद्देशाने हे कारस्थान सुरू असल्याचे गुप्तचर संस्थांचे म्हणणे आहे. काही लष्करी अधिकारी हेरांच्या जाळ्यात फसले असून, त्यांच्याकडून काही माहिती बाहेर गेली असल्याचेही गुप्तचर संस्थांच्या पाहणीत आढळले असल्याचे समजते.

Share