मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या निमित्ताने मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा साक्षात्कार झाल्याचं सांगत ती आठवण सांगितली. यावर कॉँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत आपल्या ट्वीट मध्ये म्हणतात, राज ठाकरे यांच्यावर लगे रहो मुन्नाभाई किंवा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय चित्रपटाचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. पाठीवर हात ठेवणं, चोक होणं, साक्षात्कार वैगेरे, अशी टीका त्यांनी उपहासात्मकपणे केली आहे. राज ठाकरेंनी मुलाखतीत आपण ‘गांधी’ चित्रपट ३० ते ३५ वेळा पाहिल्याचं सांगितलं होतं. त्यावरुनही त्यांनी टोला लगावत, एखादा चित्रपट ३०-३२ वेळा पाहण्याची सवय आहेच असं म्हटलं.
१/२ राज ठाकरे यांच्यावर लगे रहो मुन्नाभाई किंवा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय चित्रपटाचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. पाठीवर हात ठेवणं, चोक होणं, साक्षात्कार वगैरे …
एखाद्या चित्रपट ३०-३२ वेळा पाहण्याची सवय आहेच….🤔— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 16, 2022
“छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला समजण्याची इच्छा व्यक्त करण्याआधी राज ठाकरे यांना महाराज कळले असते तर सतत भूमिका बदलल्या नसत्या आणि भोंगे शोधले नसते. खरोखरच महाराज त्यांना कळावे ही सदिच्छा,” असंही सचिन सावंत म्हणाले आहेत.
राज ठाकरेंनी सांगितलेला प्रसंग
१९९४ सालची ही गोष्ट आहे. मी माझ्या कार्यालयात बसलो होतो. डायरीत शिवजयंतीचे कार्यक्रम लिहिले होते. ‘सामना’चे बाजीराव दांगट आणि त्यांचे भाऊ माझ्याकडे आले. बाळासाहेब फार वर्षांपूर्वी शिवनेरीला आले होते, त्यानंतर ठाकरे घराण्यातील कोणी आलेलं नाही, तर तुम्ही या असा आग्रह त्यांनी केला. मी त्यांना व्यग्र असल्याचं सांगत डायरी दाखवत होतो. माझे सगळे कार्यक्रम आखले असल्याने शक्य नाही असं मी त्यांनी सांगत होतो, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
रात्री मी घरी आल्यानंतर काय झालं माहिती नाही. मी दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यालयात आलो, सर्व कार्यक्रम रद्द केले आणि तिथे शिवनेरी असं लिहिलं. शिवजयंतीच्या आदल्या दिवशी मी जुन्नरला गेलो. सकाळी ४ वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.