मुंबई : राज्यातील १४ हजार शाळा कमी पटसंख्येच्या नानाखाली बंद करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे समजते. कमी पटसंख्येच्या शाळा या दुर्गम, अतिदुर्गम, ग्रामीण भाग, आदिवासी पाडे या भागात आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शेतकरी, कष्टकरी, गरीब व सामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेत असतात. गाव- खेड्यातील या शाळा बंद केल्या तर ही मुले शिक्षणापासून वंचित राहतील. त्यामुळे शाळा बंद करण्याची कार्यवाही तात्काळ थांबवावी, अशी मागणी काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यासंदर्भात नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहिले आहे.
नाना पटोले यांनी पत्रात म्हटलं की, महाराष्ट्र हे शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर व प्रगत राज्य म्हणून देशात ओळखले जाते. विविध नामवंत शिक्षण हा पुढील शिक्षणाचा पाया आहे असे असताना आपले सरकार मात्र मुलांना प्राथमिक शिक्षणापासूनच वंचित करत आहेत. संसंदेत २००९ मध्ये शिक्षणाचा अधिकार कायदा पारित करण्यात आला आहे. या कायद्याने ६ ते १४ वर्षांच्या प्रत्येक बालकास जवळच्या शाळेत प्रवेशासोबत मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद आहे. या वयोगटातील बालकांना शिक्षण मिळण्याची खात्री करण्यासाठी राज्य सरकार बांधील आहे. खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २५% आरक्षणही या तरतूदीकरीता लागू आहे.
महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या ० ते २० पर्यंत असलेल्या शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. यामुळे आदिवासी पाडे आणि दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होत आहे. शाळा बंद केल्या तर या भागातील मुलांना शिक्षणासाठी कुठे जायचे? गावापासून दुर अंतरावरील शाळांमध्ये जाऊन शिक्षण घेणे लहान मुलांना किती अडचणीचे ठरू शकते याचा विचार करायला हवा. शाळा बंद करण्याचा जो घाट घातला जात आहे त्याला सर्व स्तरातून विरोध आहे. सामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या अशा निर्णयास काॅंग्रसे पक्षाचाही विरोध आहे. राज्यातील ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी जनतेच्या मुलांना शाळेपासून वंचित ठेवण्याचे पाप आपण करू नये, असे नाना पटोले यांनी पत्राद्वारे म्हटले आहे.
राज्यातील २० हुन कमी पटसंख्या असलेल्या १४ हजार शाळा बंद करण्याची कार्यवाही थांबवण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @mieknathshinde यांना पत्र लिहिले.
ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी जनतेच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवून त्यांचे भविष्य अंधारात ढकलण्याचे पाप करू नका! pic.twitter.com/ttYX8DVXT7— Nana Patole (@NANA_PATOLE) October 13, 2022