पुणे : राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) लालपरी प्रथम १ जून १९४८ रोजी पुणे-नगर मार्गावरून धावली होती. राज्यातील एसटी सेवेस ७४ वर्ष पूर्ण होऊन ती ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. अशावेळी राज्यात पहिली एसटी सुरू झालेल्या पुणे-अहमदनगर मार्गावरच एसटीची पहिली ई-बस आजपासून सुरू होत आहे. पुणे विभागाच्या या पहिल्या विद्युतप्रणालीवरील बसचे लोकार्पण आज स्वारगेट बसस्थानकावर उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शखेर चंदे, अपर मुख्य सचिव आशिष सिंग उपस्थित होते.
शिवनेरी, अश्वमेध, शिवशाही अशा वातानुकूलित बस सेवेनंतर शिवाई ही ई-बस सुरू होत आहे. यामध्ये ४३ लोक प्रवास करू शकणार आहेत. याचा वेग ८० किलोमीटर प्रतितास असणार असून लवकरच टप्प्याटप्प्याने राज्यभरात ही बस सेवा सुरू करण्यात येतील. पहिल्या टप्प्यात पुणे ते औरंगाबाद, पुणे ते सोलापूर, पुणे ते नाशिक, पुणे ते कोल्हापूर यादरम्यान बस सेवा सुरू होणार आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले, राज्यात १९३२ साली पहिली खाजगी बस वाहतूक सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर १ जून १९४८ ला मुंबई प्रांतात पुणे-नगर ही एसटी बस प्रथम धावली. काळानुरूप एसटी प्रवासात वेगवेगळे बदल होत गेले. मागील दोन वर्षांपासून कोरोना संकटाची किंमत एसटीलाही मोजावी लागली. यादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचा संपही झाला. मात्र आपण एक परिवारातील असून कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये असेच आपले मत होते आणि आता एसटीला कोणचीही दृष्ट लागू नये.