आता उरल्या फक्त आठवणी : के. के. यांचे मुंबईशी होते खास नाते

मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय गायक कृष्णकुमार कुन्नथ ऊर्फ के. के. यांनी वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी जगातून अकाली एक्झिट घेतली आहे. कोलकातामध्ये काल मंगळवारी रात्री एका कॉन्सर्टदरम्यान स्टेजवरच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच संगीतप्रेमींमध्ये दु:खाची लाट पसरली आहे. दरम्यान, के. के. यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. के. के. यांचे मायानगरी मुंबईशी खास नाते होते. त्यांना मरीन ड्राइव्हची सैर करणे खूप आवडत असे.

कृष्णकुमार कुन्नथ ऊर्फ के. के. हे लहानपणापासून गाड्यांचे शौकीन होते. के. के. जेव्हा कधी एखादी नवी गाडी घेत असत तेव्हा त्या गाडीतून मुंबईतील मरीन ड्राइव्हवर फेरफटका मारत असत. यामागेही एक खास कारण होते. के. के. यांनी एका मुलाखतीमध्ये याबाबत माहिती दिली होती. त्यांनी म्हटले होते की, ‘मला लहानपणापासून गाड्या फार आवडत असत. मला माझे वडील कधी गाडी चालवायला द्यायचे नाहीत हे यामागचे कारण होते. आमच्याकडे मारुती गाडी होती. ज्योतीसह (त्यावेळी ज्योती त्यांची प्रेयसी होती, आता पत्नी) मला फिरायला मिळायचे नाही. एकदा तर मी डुप्लिकेट चावी बनवली होती, साबणावर छाप काढून. त्यानंतर माझ्या बाबांनी कारची चावी लपवली होती.’

मरीन ड्राइव्हवर फेरफटका
के. के. यांना मरीन ड्राइव्हवर सैर करायला खूप आवडत असे. ते अनेकदा या ठिकाणी फिरायला येत असत. याबाबत त्यांनी असे म्हटले होते की, ‘उन्हाळ्यामध्ये आम्ही कारने एसीशिवाय फिरत असायचो. आता माझ्याकडे चार गाड्या आहेत. मी नेहमी लाँग ड्राइव्हवर जातो. मला आठवतंय, मी जेव्हा मुंबईत आलो होतो, तेव्हा मला मरीन ड्राइव्हवर बसायला आवडत असेत. मी आणि ज्योती नेहमी तिथे जायचो. त्या ठिकाणी टॅक्सीतून येणारी-जाणारी लोकं पाहिली की वाटायचं की, मी जेव्हा कार घेऊन तेव्हा इथे येईन. तेव्हापासून मी जेवढ्या गाड्या घेतल्या आहेत त्यातून मी मरीन ड्राइव्हवर नेहमी जातो. तिथे काही वेळ घालवतो आणि मग परत येतो. त्या ठिकाणी क्षणभर विश्रांती मिळते आणि माझ्यासाठी हे एक नॉस्टॅलजिया आहे.’

पहिल्या जिंगलचे १५०० रुपये मिळाले होते
के. के. हे मल्याळी होते. ते दिल्लीत वाढले. दिल्लीत माउंट मेरी स्कूल आणि किरोडीमल काॅलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले होते. त्यांनी किरोडीमल काॅलेजमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. एका मुलाखतीत के. के. यांनी सांगितले होते की, ‘शाळेत दुसरीत असताना वर्गासमोर मी गाणं गायलं होतं. याआधी मी काही गाणं शिकलो नव्हतो. सगळ्यांनाच ते खूप आवडलं. माझ्या शिक्षकांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं होतं. मी इंटरस्कूल स्पर्धेतही भाग घेऊ लागलो. मला नेहमी पहिलं बक्षीस मिळत असे. नंतर काॅलेज सुरू झालं. तिथेही मी गायचो. अनेकदा पैसेही मिळायचे. पहिल्या जिंगलचे १५०० रुपये मिळाले होते. मी किशोर कुमारची गाणी ऐकायचो. पाश्चात्य गाणी ऐकायचो. मग राॅक म्युझिक.’

”तडप तडप के” आणि ”छोड आये हम वो गलियाँ” गाण्यामुळे मिळाली लोकप्रियता
काॅलेजमध्ये असताना के.कें. नी तीन राॅक बँड तयार केले होते. एकात क्लासिक राॅक, दुसऱ्यात नियो आणि तिसऱ्यात पाॅप. दिल्लीत खूप फेस्टिवल व्हायचे. तिथे त्यांच्या बँडला बोलावलं जायचं. दिल्लीत सुरू केलेला संगीताचा प्रवास के.कें. नी मुंबईपर्यंत आणला. के.कें.नी ३५०० जिंगल्स केले होते. त्यांची भेट गायक, संगीतकार ए.आर.रेहमान यांच्याशी झाली. रेहमान यांनी के.कें.ना ब्रेक दिला आणि त्यानंतर के.कें.नी मागे वळून पाहिलंही नाही. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमातलं ”तडप तडप के….” आणि ‘माचिस’ सिनेमातलं ”छोड आये हम वो गलियाँ..” या गाण्यामुळे के. के. कमालीचे लोकप्रिय झाले. याशिवाय त्यांनी अनेक गाणी गायली, जी रसिकांच्या कानात आजही रुंजी घालतात.

Share