विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळाला प्राधान्य द्यावे – राज्यपाल कोश्यारी

सोलापूर : सध्याचे युग हे धावपळीचे आहे. ताणतणाव कमी करण्यासाठी प्राचीन काळापासून खेळाला महत्त्व आहे. यामुळे विद्यार्थांनी शिक्षणाबरोबरच खेळाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात बहुउद्देशीय आंतरगृह क्रीडा सभागृहाचे भूमिपूजन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर कुलगुरू डाॅ. मृणालिनी फडणवीस, कुलसचिव डाॅ. सुरेश पवार उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ नवीन असले तरी उपक्रमशील आहे. शासनासह स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन निधीची उभारणी करावी. या निधीतून खेळाची अत्याधुनिक साधने घ्यावीत, जेणेकरुन विद्यार्थांना इतर ठिकाणी जावे लागू नये. शिक्षण घेत असताना जेवढा अभ्यास आवश्यक आहे. तेवढेच खेळही आवश्यक आहेत. या क्रीडा सभागृहाचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन राष्ट्रीय, ऑलिंपिकसारख्या स्पर्धा प्रकारात चांगले यश मिळवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ या अभियानातून शंभर एकर क्षेत्रात साकारणारे बहुविध उपयोगी आंतरगृह क्रीडा सभागृह हे महाराष्ट्रातील एकमेव सभागृह होत आहे. यासाठी केंद्र सरकारकडून साडेचार कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.

या बहुउद्देशीय क्रीडा सभागृहात विविध १७ प्रकारच्या इनडोअर खेळांचा समावेश आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाच्या सरावासाठी आता जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी जाण्याची आवश्यकता राहणार नाही. बहुउद्देशीय क्रीडा सभागृह पदवीदान समारंभासाठीही उपयुक्त असा बनविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

Share