उन्हाचा पारा वाढतोय, औरंगाबादकरांनो उष्माघातापासून सावधान !

औरंगाबाद : शहरातील तापमानाने ४३ अंश सेल्सियस पर्यंत मजल मारली आहे. सोमवारी शहरातील तापमान ४३ अंश सेल्सियस इतके होते. तर मंगळवारी हे तापमान ४२ अंश सेल्सियस होते. त्यामुळे आरोग्य व प्रशासनाच्या वतीने औरंगाबादकरांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील २४ तासांमध्ये शहराचे तापमान कायम राहण्याची शक्यता असून दुपारी १२ ते ३.३० या वेळेमध्ये उन्हात न फिरण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सुचविले आहे. त्यानुसार रुग्णालयांना पुरेसा औषधसाठा व इतर तयारी, संबंधितांना प्रशिक्षण, सार्वजनिक ठिकाणी उष्णतेपासून बचावासाठी तात्पुरती व्यवस्था, पशू, प्राण्यांसाठी औषधे, पाणी व चारा व्यवस्था यासह आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.  गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.

Share