शरद पवारांनी आता उद्धव ठाकरेंना सल्ले द्यावेत : देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला

मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ले द्यावेत. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत त्यावर जर एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार यांनी त्यांच्या महाविकास आघाडी सरकारला जर निर्देश दिले तर, ते अधिक चांगले होईल, असा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिला आहे.

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, शरद पवारांनी आता देशाची चिंता करू नये. जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खूश आहे. देशात मोदी सरकार अतिशय उत्तम काम करत असून, वेळोवेळी जनतेने नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या मोलाच्या सल्ल्याची गरज मोदी यांना नाही. आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ल्याची खरी गरज आहे. त्यामुळे पवारांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला द्यावा, असा टोला फडणवीस यांनी लगावला. शरद पवारांनी इतर कोणत्याही गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी महाराष्ट्रातील प्रश्नांकडे लक्ष दिले तर अधिक बरे होईल, असेही फडणवीस म्हणाले.

राज ठाकरे यांनीदेखील या सरकार विरोधात लढावे

यावेळी फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनादेखील सल्ला दिला. फडणवीस म्हणाले, आम्ही ठाकरे सरकार विरोधात लढत असून, राज ठाकरे यांनीदेखील या सरकार विरोधात लढावे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना आज लिहिलेल्या पत्रावरूनदेखील त्यांनी यावेळी राज ठाकरे यांना मोलाचा सल्ला दिला. राज ठाकरे मुख्यमत्र्यांकडून इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील असे वाटले नव्हते. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदाराकडून होणाऱ्या विरोधाबाबत बोलताना ते म्हणाले, याबाबत मला फारसे काही माहीत नाही. तसेच त्याबाबत माझे त्यांच्याशी काही बोलणेदेखील झालेले नाही. जर कुणी रामाच्या चरणी जात असेल तर, त्याला कुणी रोखू नये, असे ते म्हणाले. मात्र, राज ठाकरेंना कशामुळे विरोध केला जात आहे या भूमिकेमागील नेमके कारण आपल्याला माहीत नसल्याचे फडणवीस म्हणाले.

योगींचे मुंबईत कार्यालय, फडणवीस म्हणतात…
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईमध्ये कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली आहे, यावर बोलताना फडणवीस म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, येथे सर्व राज्यांची भवनं आहेत. त्याशिवाय अनेक राज्यांची गुंतवणूक कार्यालये आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशने या ठिकाणी एखाडे कार्यालय मुंबईत काढले तर, लगेच कुणी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. मुंबई पावरफुल आहे, महाराष्ट्र पावरफुल असून, महाराष्ट्राची एक ताकद आहे, शक्ती आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील एखादे कार्यालय येथे सुरू झाले काय आणि नाही झाले काय काही फरक पडणार नाही. मात्र, ज्या पद्धतीने राज्यात सध्या कारभार सुरू आहे. काही मंत्री जेलमधून कारभार करतायेत. त्याशिवाय राज्यात ज्या पद्धतीने दुराचार सुरू आहे याचा परिणाम निश्चित महाराष्ट्रावर होईल, असा दावा फडणवीस यांनी केला.

Share