औरंगाबाद : राज्यातील भाजपच्या प्रमुख ओबीसी चेहऱ्यांपैकी एक असलेल्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्याचे पडसाद आता राज्यातील विविध ठिकाणी उमटताना दिसतं आहेत. औरंगाबादमध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी भाजपाचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच कारवाई करत या कार्यकर्त्यांना रोखलं. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान भाजपने पंकजा मुंडे यांची उमेदवारी नाकारल्याने जळगावमध्येही आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयावर आंदोलन करत भाजपविरोधात घोषणाबाजी केली आहे. पंकजा मुंडे यांना सातत्याने डावललं जातंय असं मत समर्थकांनी व्यक्त केलं आहे.
भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली नाही, तर आता येत्या निवडणुकांत ओबीसी समाज भाजपला उत्तर देणार आहे.” असं मत समर्थकांनी व्यक्त केलं आहे. त्यानंतर पोलिसांनी समर्थकांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान परभणीतही सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांची उमेदवारी नाकारल्यावरून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली असून यासंदर्भात २ दिवस कोणतीच भूमिका माध्यमांसमोर मांडणार नसल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.