नवी दिल्लीः प्राप्तीकर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षीही कर रचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. २०२० साली बदलण्यात आलेली कर रचना सलग तिसऱ्या वर्षी तशीच ठेवण्यात आलीय. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही कर रचना समान असेल .
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मंदीसदृष्य परिस्थिती होती. त्या परिस्थितीमध्ये आता काहीशी सुधारणा होत असून अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येताना दिसत आहे. पण गेल्या दोन वर्षांचा विचार करता केंद्र सरकारने या वर्षीच्या कर रचनेत बदल व्हावी आणि ती कमी करण्यात यावी अशी मागणी होत होती. पण या वर्षी त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.
आताच्या करसंरचनेप्रमाणे दहा ते १२ लाख ५० हजार रूपये उत्पन्न असणाऱ्यांना २० टक्के कर भरावा लागतो. तर १२ लाख ५० हजार ते १५ लाख उत्पन्न असणाऱ्यांना २५ टक्के प्राप्तीकर भरावा लागतो. १५ लाखांच्या पुढे उत्पन्न असणाऱ्यांना यापुढे ३० टक्के प्राप्तीकर भरावा लागतो. हीच करसंरचना पुढील वर्षभर कायम राहणार आहे.
अशी असेल आर्थिक वर्ष २०२२-२३ ची करप्रणाली
- ५ लाखांपर्यंत कोणताही कर नाही
- ५ ते ७.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के कर
- ७.५ ते १० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के कर लागणार
- १० ते १२.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के कर लागणार
- १२.५ ते १५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २५ टक्के कर लागणार
- १५ लाखांपुढच्या उत्पन्नावर पुढे ३० टक्के कर लागणार