मोकळ्या भूखंडांसाठीही आता भरावा लागणार मालमत्ता कर

कर वसुलीसाठी शहरातील सर्व मालमत्ता ‘जीआयएस सिस्टिम’द्वारे ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी नोंदवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मोकळे खासगी भूखंड शोधून त्यावर कर लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नुकताच बीड बायपासजवळील जबिंदा मैदानालादेखील कर लावण्यात आला, अशी माहिती मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली. मनपाने ३५० कोटी रुपयांच्या मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ठरविले होते. त्यानुसार आतापर्यंत मालमत्ता करापोटी १३२.४६ कोटी, तर पाणीपट्टीची २२.४७ कोटी रुपयांची वसुली केली आहे. उर्वरित १० दिवसांत जास्तीत जास्त वसुलीचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी आता मालमत्तांची व्यावसायिक, रहिवासी आणि मोकळे भूखंड असे वर्गीकरण करून मालमत्ता कराची वसुली केली जाणार आहे. अनेक वसाहतीत अशा प्रकारचे मोकळे प्लॉट आहेत. त्यांच्याकडूनही मालमत्ता कर वसूल केला जाणार आहे.

एक कोटीचा कर थकवणारी आइस्क्रीम फॅक्टरी सील : चिकलठाणा भागात रतन बाबुलाल गुर्जर यांची आइस्क्रीम फॅक्टरी आहे. त्यांच्याकडे १ कोटी १६ लाख ३५ हजार १८६ रुपयांचा कर थकीत असल्याने महापालिकेच्या प्रभाग कार्यालय सहाने नोटीस बजावली होती, पण कर भरण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने बुधवारी या कंपनीला सील लावण्यात आले.

Share