शिक्षक दिन विशेष: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन; शिक्षक ते नेता

Happy Teacher’s Day 2022 : शिक्षक दिन भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा होतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी जाणून घेऊ…

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला होता. सर्वपल्ली राधाकृष्णन एक सुप्रसिद्ध विद्वान, शिक्षक, नेता होते. एकदा त्यांचे विद्यार्थी आणि मित्रांनी त्यांना सांगितले की ते त्यांचा वाढदिवस साजरा करू इच्छितात. त्यावर त्यांनी सांगितले होते, ‘माझा जन्मदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी शिक्षक दिवस म्हणून साजरा झाला तर मला अभिमान वाटेल.’ हा दिवस १९६२ सालापासून शिक्षक दिन म्हणून साजरा होऊ लागला.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ –

१. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी आंध्र प्रदेशातील तिरुत्तानी या गावी झाला.

२. तिरुत्तानी गावात त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. १०९३ मध्ये त्यांनी मद्रास विद्यापीठात पुढचं शिक्षण पूर्ण केलं. कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी असा त्यांचा नावलौकिक होता.

३. वाचनाची त्यांना प्रचंड आवड होती. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता.

४. त्यांचा वेदांचा विशेष अभ्यास होता. तत्त्वज्ञान या विषयात त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.

५. १९०९ मध्ये त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये त्यांनी पाच वर्ष अध्यापनाचं काम केलं. म्हैसूर इथं तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलं.

६. ३५व्या वर्षी जॉर्ज पंचम यांच्या ‘चेअर ऑफ फिलॉसॉफी’ या पदी विराजमान होण्याचा मान मिळवला.

७. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना ‘नाईटहूड’ने सन्मानित केलं. ही बिरुदावली पटकावणारे सर्वपल्ली हे पहिले आशियाई व्यक्ती होते.

८. राधाकृष्णन यांनी आंध्र तसंच बनारस हिंदू विद्यापीठाचं कुलगुरूपद भूषवलं.

९. १९३१ ते १९३९ या आठ वर्षांच्या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेत भारताचं प्रतिनिधित्व केलं.

१०. १९४९ ते १९५२ या कालावधीत ते रशियात भारताचे राजदूत होते.

११. रशियाहून परतल्यानंतर राधाकृष्णन यांनी १९५२ ते १९६२ या कालावधीत उपराष्ट्रपतीपद भूषवलं. १४ मे १९६२ रोजी ते भारताचे राष्ट्रपती झाले.

१२. १९५४ मध्ये त्यांना देशातील सर्वोच्च अशा ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.

१३. राधाकृष्णन यांना नोबेल साहित्य पुरस्कारासाठी १६ वेळा तर नोबेल शांतता पुरस्कारासाठी ११ वेळा मानांकन मिळालं होतं.

१४. माझा जन्मदिवस साजरा करण्याऐवजी हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात यावा असे विचार सर्वपल्ली यांनी राष्ट्रपती असताना मांडले होते. तेव्हापासून ५ सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

१५. १७ मे १९७५ रोजी त्यांचं निधन झालं.

Share