आग्रा : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर काल बुधवारी (१ जून) त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाजशी लग्नबंधनात अडकला. आग्रा येथील फतेहाबाद रोड भागातील जे. पी. पॅलेसमध्ये या दोघांचा विवाह धुमधडाक्यात पार पडला. दोघांनी सात फेरे घेण्यापूर्वी दीपक चहरची आकर्षक वेशात घोड्यावरून वरात काढण्यात आली. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
दुखापतीमुळे नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या १५ व्या हंगामात दीपक चहर खेळू शकला नव्हता. आयपीएलमध्ये दीपक चहरला चेन्नई सुपर किंग्ज संघाने १४ कोटी रुपयांना खरेदी केले होते. मात्र, दुखापतीमुळे त्याला २०२२ च्या आयपीएलच्या पर्वात भाग घेता आला नाही. दीपकने गेल्या वर्षी आयपीएल सुरू असताना स्टेडियममध्ये त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाज हिला सर्वांसमोर प्रपोज केले होते. बुधवारी रात्री आग्रा येथील जे. पी. पॅलेस या पंचतारांकित हॉटेलमध्ये दीपक चहर आणि जया भारद्वाज या दोघांनी सात फेरे घेतले. या विवाह सोहळ्यासाठी या दोघांचे जवळचे नातेवाईक आणि खास मित्र उपस्थित होते. त्याआधी मंगळवारी मेहंदी आणि संगीत कार्यक्रम झाला होता.
सेहरा बांध के मैं तो आया रे…
लग्नासाठी दीपकने क्रीम कलरची शेरवाणी आणि राजस्थानी साफा घातला होता. दीपक घोड्यावर बसून आला होता. दीपकची लग्न मंडपातील एंट्री एखाद्या राजकुमारासारखी वाटत होती. जयाने लग्नासाठी पीच कलरचा लहंगा-चुनरी घातली होती. दोघांनी एकमेकांना हार घातले आणि त्यानंतर सात फेरे घेतले.
दीपकच्या सहकाऱ्यांची अनुपस्थिती
दीपक आणि जया यांच्या विवाहासाठी केंद्रीय राज्यमंत्री आणि अनेक आजी-माजी खासदार उपस्थित होते. भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू आणि दीपकचा चुलत भाऊ राहुल चहल त्याची पत्नी ईशानीसह उपस्थित होता. राहुलने या वर्षी ९ मार्च रोजी गोव्यात विवाह केला होता. लग्नासाठी काही माजी क्रिकेटपटूदेखील होते; पण दीपकसोबत खेळणारा एकही खेळाडू लग्नात दिसला नाही. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी येणार असल्याची चर्चा होती; परंतु तोदेखील या विवाह सोहळ्यासाठी आला नाही.
जया भारद्वाज ही दीपक चहरची बहीण मालती चहरची मैत्रीण आहे. मालती यांनीच जया आणि दीपक या दोघांची ओळख करून दिली होती. या दोघांच्या लग्नापूर्वी या दोघांच्या लग्नपत्रिकेचे फोटो समोर आले होते. जया भारद्वाज एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये नोकरी करते. जयाने मुंबई विद्यापीठातून पदवी संपादन केलेली आहे. सध्या दीपक-जया यांच्या लग्नाची चांगलीच चर्चा होत असून, त्यांच्या विवाह सोळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.