जळगाव : फैजपूर येथील बाजारासाठी बोलेरो पीकअप वाहनातून बकर्या घेऊन जाणार्या वाहनाला सुसाट वेगाने रॉंग साईडने येणार्या ट्रकने उडविले. बोलेरो गाडीला धडक दिल्यानंतर हाच ट्रक आणखी एक ट्रकवर धडकला. या भीषण अपघातात पाच जण ठार झाले आहेत. आज बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जळगाव तालुक्यातील नशिराबाद ते साकेगाव दरम्यान सिमेंट फॅक्टरीजवळ रेल्वे उड्डाणपुलावर हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकूण सहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
आज बुधवारी (२९ जून) फैजपूर येथे आठवडी बाजार आहे. आज सकाळी फैजपूर येथील बाजारासाठी जळगाव येथून बकर्या घेऊन बोलेरो पीकअप वाहन (क्र. एम.एच.४३/ए.डी.१०५१) व (एम.एच.४३/बी.बी.००५०) ही भुसावळच्या दिशेने जात होती. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद ते साकेगावदरम्यान टोल नाक्याच्या पुढे असणार्या सिमेंट फॅक्टरीजवळ रेल्वे उड्डाणपुलावरील वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रक (क्र.एम. एच.०९/एच. जी.९५२१) ने या दोन्ही वाहनांना जोरदार धडक दिली. या तिहेरी वाहनांच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
नईम अब्दुल रहिम खाटीक (वय ६२, रा. तांबापुरा, जळगाव), शेख फारूक शेख मजीद (वय ४२, रा. हकीमनगर, ता.भडगाव), अखिल शेख गुलाब खाटीक (वय ४०, रा. इस्लामपुरा, फैजपूर), जुनेद सलीम खाटीक यांच्यासह अन्य एकाचा मृतात समावेश आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, चार जणांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकच्या धडकेत तीन जण उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळले. या अपघातानंतर ट्रक उड्डाणपुलावरील पिलरला धडकला, तर दोन्ही पिकअप वाहनांचा चक्काचूर झाला. एका पिकअप गाडीची ट्रॉली ट्रकला चिकटली होती. ट्रकच्या धडकेने बोलेरो पिकअप वाहनातून प्रवास करणारे लोक पुलाखाली फेकले गेले. जबर मार लागल्याने त्यातील चौघे जागीच ठार झाले, तर एकाचा उपचारादरम्यान गोदावरी रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातात सहा जण जखमी झाले असून, त्यांच्यावर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातात ट्रकचालकही जखमी झाला आहे. त्याचे नाव समजू शकले नाही.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. नशिराबादचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण मोरे, उपनिरीक्षक राजू साळुंखे, महामार्ग वाहतूक पोलिस विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील मेढे, उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे, सहाय्यक फौजदार सुनील पाटील, किरण हिवराळे, अनिल सपकाळे, पवन देशमुख, हितेश पाटील, दीपक पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना गोदावरी रुग्णालयात हलविले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.