ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; एक रुपयामध्ये १० सॅनिटरी नॅपकीन देणार

मुंबई : दारिद्र्यरेषेखालील महिला, बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकिन (sanitary napkins) देण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील ६० लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. ही योजना १५ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी (ता. २८) दिली. मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे

मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व जागतिक प्रश्न आहे. गेल्या वर्षात मासिक पाळीच्या वेळी काळजी न घेतल्याने व अस्वच्छतेमुळे जगभरातील आठ लाख महिलांचा मृत्यू झाला आहे. स्त्रियांच्या होणाऱ्या मृत्यूमागे हे सर्वात मोठे कारण असून, हा प्रश्न सोडविण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी नाममात्र एक रुपयामध्ये ग्रामविकास खात्याकडून ही नवीन योजना राबवण्यात येणार आहे.

केवळ १२ टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकीन वापरतात

भारतात दरवर्षी १२० दशलक्षाहून अधिक महिलांना मासिक पाळीचा त्रास होऊन आजारांचा सामना करावा लागतो. भारतात ३२० दशलक्ष मासिक पाळी होणाऱ्या स्त्रियांपैकी केवळ १२ टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकीन वापरतात. यामुळे चार वर्षे भारतात ६०,००० हून अधिक स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोगामुळे होणारा मृत्यू पैकी दोन तृतीयांश मृत्यू मासिक पाळीबद्दलच्या समजूतीमध्ये निष्काळजीपणामुळे होतो. हीच आकडेवारी महाराष्ट्रात पाहायला गेले तर केवळ ६६ टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरतात. याबद्दलही शहरी भागाचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागातील फक्त १७.३० टक्के स्त्रियांपर्यंत सॅनिटरी नॅपकिनची सुविधा पोहोचत असते. या समस्येच्या मुळाशी गेले असता सॅनिटरी पॅड वापरण्याबाबत जागृकता नसणे, सॅनेटरी पॅड खरेदी करण्याची समस्या उद्भवणे अशा अनेक प्रश्नांना स्त्रिया सामोरे जात असतात.

दारिद्र्य रेषेखालील १९वर्षावरील सर्व महिलांसाठी योजन

सध्या महाराष्ट्रात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेत फक्त १९ वर्षाखालील युवतींना सहा रुपयात सहा नॅपकिन्स असलेले कीट पुरवण्यात येतात. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. म्हणून हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत दारिद्र्यरेषेखालील सर्व युवती व महिलांना या समस्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना व बचत गटांमधील महिलांना एक रुपये नाममात्र किमतीमध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात १५ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

Share