मुलानेच केली जन्मदात्या आई-वडिलांची हत्या

कल्याण : कल्याणजवळ असलेल्या टिटवाळा मांडा येथील पंचवटी चौकातील ‘साई दर्पण’ इमारतीत मुलानेच आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत मुलाला अटक केली आहे. विशेष म्हणजे चाकूने गळ्यावर वार करत आई-वडिलांची हत्या केल्यानंतर आरोपी मुलाने
बहिणीला या घटनेची माहिती देऊन बोलावून घेतले. आई-वडिलांची हत्या केल्यानंतर मुलगा दोन दिवस त्यांच्या मृतदेहांशेजारी बसून होता.

अशोक भोसले (वय ७० वर्षे), त्यांची पत्नी विजया भोसले (वय ६० वर्षे) आणि त्यांचा मुलगा अनमोल (वय ३७ वर्षे) हे टिटवाळा मांडा येथील पंचवटी चौकातील ‘साई दर्पण’ इमारतीत राहत होते. अनमोलचे लग्न झाले असून, तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो. आई-वडील मयत झाल्याचे अनमोलने गुरुवारी संध्याकाळी आपल्या बहिणीला सांगितले आणि घरी बोलावून घेतले. अनमोलची बहीण घरी आली तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आई-वडिलांना पाहून तिला धक्काच बसला. घरात दुर्गंधीदेखील येत होती व तिचा भाऊ अनमोल आई-वडिलांच्या मृतदेहांशेजारीच बसला होता.

हा सारा प्रकार संशयास्पद वाटल्याने तिने याबाबत टिटवाळा पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अशोक भोसले व त्यांची पत्नी विजया भोसले या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. या दोघांची हत्या त्यांचा मुलगा अनमोलने केल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी अनमोलला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. अनमोलनेच चाकूने गळ्यावर वार करत आई-वडिलांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

कौटुंबिक वादातून अनमोलला नैराश्य आले होते. याच नैराश्यातून अनमोलने आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याने बुधवारी आपल्या आई-वडिलांची चाकूने वार करत हत्या केली असावी. दिवसभर तो दोघांच्या मृतदेहासोबतच होता. अखेर त्याने गुरुवारी संध्याकाळी आपल्या बहिणीला आई-वडील मयत झाल्याचे सांगून घरी बोलावून घेतले आणि त्यानंतर हा सारा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती पोलिसांनी दिली. टिटवाळा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत अनमोल भोसले याला अटक केली आहे.

Share