युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित असेल : निलंगेकर

लातूर : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे भारतातील हजारो वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना स्वदेशी परतावे लागले आहे. त्यांना शिक्षण अर्धवट सोडून यावे लागले असल्याने त्यांना आता भवितव्याची काळजी असेल मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने या  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षीत करण्याच्या दृष्टीकोनातून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. लवकरच भारतीय शैक्षणिक प्रणालीमध्ये त्यांना सहभागी करून त्यांचे शिक्षण पुर्ण करून त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यात येईल अशी ग्वाही माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील जवळपास ३१ विद्यार्थी युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते. युद्धजन्य परिस्थितीमुळे हे विद्यार्थी आता आपल्या मूळगावी परतत आहे. येथील वेदांत शिंदे, मोक्षदा कदम, तुपार म्हेत्रे, पल्लवी म्हेत्रे, ऋतुजा देशमाने यांच्याशी माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी संवाद साधताना ही ग्वाही दिली आहे. या विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी हे विद्यार्थी सुरक्षीत परत आल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.

युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु झालेल्या युद्धामुळे युक्रेनमधून भारतातील जे विद्यार्थी वैद्यकीय
शिक्षण घेण्यासाठी तेथे गेले होते त्यांना सुरक्षीत परत आणने याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने प्राधान्य दिले असल्याचे सांगत माजी मंत्री आ. निलंगेकरांनी ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतातील सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षीत परत आणण्यात येईल असा विश्वास व्यक्त करून देशातील प्रत्येक जिल्ह्यातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते त्यांना परत आणण्याकरीता केंद्र सरकारने जी मोहिम उघडली होती त्या मोहिमेत भाजपच्या मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेतले होते. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच विद्यार्थी सुखरुप परत येऊ लागले असून लातूर जिल्ह्यातील कांही विद्यार्थी आतापर्यंत परत आलेले असले तरी उर्वरित विद्यार्थी लवकरच परततील अशी माहितीही आ. निलंगेकरांनी यावेळी दिली. युद्ध परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडून यावे लागले असले तरी त्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित रहावे याकरीता केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या विद्यार्थ्यांना भारतीय शैक्षणिक प्रणालीमध्ये कशा पद्धतीने सहभागी करून घेता येईल आणि त्यांचा उर्वरीत वैद्यकीय अभ्यासक्रम कसा पुर्ण करता येईल या दृष्टीनेही केंद्र सरकारने कार्यवाही सुरु केले असल्याचे सांगत या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षीत असेल असा विश्वास माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

यावेळी युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगत युक्रेनमध्ये भारतासह अनेक देशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनेच भारतातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मोहिम राबविली असल्याचे सांगितले. इतर देशानी मात्र याबाबत कोणतीच जबाबदारी उचलली नाही. त्यामुळेच आम्ही भारतीय असल्याचा आम्हाला अभिमान असून आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याने आम्ही सुखरुप परत आलो असल्याची प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी यावेळी दिली. यावेळी प्रदेश भाजयुमोच्या सरचिटणीस प्रेरणा होनराव, लातूर भाजयुमोचे सरचिटणीस तानाजी बिराजदार आदीची उपस्थिती होती.

Share