तामिळ अभिनेत्री मीना यांच्यावर काळाचा आघात; पतीचे फुफ्फुसाच्या आजाराने निधन

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपट विश्वातील प्रसिद्ध तामिळ अभिनेत्री मीना हिचे पती विद्यासागर यांचे निधन झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. ही बातमी ऐकल्यानंतर संपूर्ण दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विद्यासागर हे गेल्या काही दिवसांपासून फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी संध्याकाळी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

विद्यासागर यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. पतीचे निधन झाल्यानंतर अभिनेत्री मीना यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्री मीना यांचे पती विद्यासागर यांच्या निधनाची दु:खद बातमी अभिनेता सारथ कुमार याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. विद्यासागर यांच्या निधनाबद्दल दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी  दु:ख व्यक्त केले आहे. दरम्यान, आज बुधवारी विद्यासागर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अभिनेता सारथ कुमार याने ट्विटरच्या माध्यमातून मीनाच्या पतीचे अकस्मात निधन झाल्याची माहिती दिली. विद्यासागर यांच्या आत्माला शांती मिळो, अशी प्रार्थना करत सारथने त्यांच्या कुटुंबीयांप्रति सहानुभुती व्यक्त केली आहे. सारथ याच्या ट्विटनंतर अनेकांनी कमेंट करत विद्यासागर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

विद्यासागर हे बंगळुरूमधील एक व्यावसायिक होते. २००९ साली त्यांचा अभिनेत्री मीना यांच्याशी विवाह झाला. त्यांना नैनिका नावाची मुलगी आहे. मीना यांनी एक बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी ९० च्या दशकात आणि २००० च्या सुरुवातीच्या वर्षात अनेक चित्रपटातून काम करून लोकप्रियता मिळवली. त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरस्टार कलाकारांसमवेत काम केले आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत Annaatthe या चित्रपटात मीना यांनी काम केले होते. मीना या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री आहेत. केवळ तामिळ भाषेतच नव्हे तर त्यांनी वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. दरम्यान, अभिनेत्रीची मुलगी नैनिका देखील आईच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात कार्यरत झाली आहे. नैनिकाने लकलाकार म्हणून विजयच्या ‘थेरी’मध्ये भूमिका केली होती.

Share