देशाचे नवे उपराष्ट्रपती जगदीप धनखड, ११ ऑगस्टला घेतील शपथ

नवी दिल्ली :  उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय झाला आहे. जगदीप धनखड यांच्या विजयानंतर देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह देशभरातील नेत्यांनी त्यांना नव्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन केले. या निवडणुकीत जगदीप धनखड ५२८ मतांनी विजयी झाले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण ७२५ मतं पडली. त्यापैकी ७१० मतं वैध तर १५ मतं अवैध आढळून आली. आता जगदीप धनखड हे देशाचे १४ वे उपराष्ट्रपती असतील. धनखड देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून ११ ऑगस्टला शपथ घेतील. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपणार आहे.

लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह यांनी दिलेल्या माहतीनुसार, धनखड यांना ७२५ मतांपैकी ५२८ मतं मिळाली. ३४६ मतांनी त्यांचा विजय झाला आहे. तर १५ मते अवैध ठरली आहेत. विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना १८२ मतं मिळाली. उपराष्ट्रपतीपदासाठी ९२.९४ टक्के मतदान झालं आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ७२५ खासदारांनी मतदान केले आहे. टीएमसीच्या ३४, भाजपच्या दोन, शिवसेनेच्या दोन आणि बीएसपीच्या एका खासदाराने मतदान केले नाही. सनी देओल विदेशात आणि संजय धोत्रे हॉस्पिटलमध्ये असल्यानं मतदान केले नाही. शिवसेनेकडून अरविंद सावंत, विनायक राऊत, गजानन कीर्तीकर, संजय जाधव, राजन विचारे हे देखील मतदानासाठी अनुपस्थित होते.

Share