सोनिया गांधींना ईडीने पाठवलेली नोटीस ही राजकीय सूड भावनेने – नाना पटोले

मुंबई : भाजपाविरोधात आवाज उठवणाऱ्या विरोधकांना दडपण्यासाठी मोदी सरकार केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत आहे. याचाच एक भाग म्हणजे नॅशनल हेराल्डप्रकरणी काॅग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीने पाठवलेली नोटीस ही राजकीय सूड भावनेने पाठवली आहे. भाजपच्या अशा दडपशाहीला काँग्रेस कधीही घाबरणार नाही असे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

यांसदर्भात नाना पटोले म्हणाले की, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीची नोटीस ही राजकीय द्वेषातून पाठवलेली आहे. या प्रकरणात एका पैशाचाही गैरव्यवहार झालेला नसून, नॅशनल हेरॉल्डशी संबंधित कोणत्याही संचालकाला लाभांश अथवा पैसे मिळालेले नाहीत. हा सर्व व्यवहार पूर्ण पारदर्शक आहे. यात कसल्याही प्रकारच्या चल-अचल संपत्तीचे हस्तांतरण झालेले नाही व कोणालाही लाभ झालेला नसताना मनी लॉड्रिंगचा गुन्हा कसा होतो? २०१५ साली बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यामागे केवळ गांधी कुटुंबाला नाहक त्रास देण्याचा प्रकार असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

काय आहे प्रकरण?

भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी ‘नॅशनल हेराल्ड’ हे वर्तमानपत्र सुरू केले होते. हे काँग्रेसचं मुखपत्र समजलं जायचं. काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडलं. मात्र २०१२ मध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांच्या ‘यंग इंडिया’ या कंपनीने या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतले. मात्र हे सुरु करण्यात आलं नव्हतं. हे हक्क घेताना १६०० कोटींची संपत्ती फक्त ५० लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. त्या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

Share