महसूल विभागात काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञान स्विकारून सामान्यांना दिलासा द्यावा – जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

ठाणे : महसूल विभागाच्या कामकाजात काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञान स्विकारून सामान्यांना दिलासा देण्याचे काम करावे. त्याचबरोबर प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. राज्य शासनाने ४० वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक केले असून त्याचाच एक भाग म्हणून पुढील वर्षापासून अधिकारी-कर्मचारी यांच्या जोडीदाराची देखील वैद्यकीय तपासणी केली जाईल, असे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनच्या समिती सभागृहात महसुल दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, रेवती गायकर, अर्चना कदम, रोहीत राजपूत आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महसूल विभाग काळानुरूप बदलतोय. दैनंदिन कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करून सामान्यांना दिलासा देण्याचे काम करतानाच स्वतःसोबतच सामान्यांचे जगणे सुंदर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी यावेळी केले.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेऊन तंदुरुस्त राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. राज्य शासनाने ४० वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक केले आहे. ठाणे जिल्हा महसूल प्रशासने त्यासाठी ठाण्यातील एका नामवंत रुग्णालयाच्या सहकार्याने ही आरोग्य तपासणी माफक दरात करून देण्याची सोय केली आहे. पुढील वर्षी अधिकारी कर्मचाऱ्याच्या जोडीदाराचीही आरोग्य तपासणी केली जाईल, असे नार्वेकर यांनी सांगितले.

४० वर्षांवरील सुमारे ४२७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करणार
यावेळी व्याख्याते देशमुख यांनी जगणे सुंदर आहे या विषयावर व्याख्यान दिले. निवासी उपजिल्हाधिकारी परदेशी यांनी प्रास्ताविक करताना महसूल दिनाची मूळ संकल्पना विषद केली. यावेळी उपजिल्हाधिकारी ठोंबरे यांनी बदलते महसूल प्रशासन याविषयी सादरीकरण केले. महसूल विभागत काळानुरूप झालेले बदल आणि फायदे याबाबत विवेचन केले. उपजिल्हाधिकारी राजपूत यांनी आरोग्य तपासणी मोहिमेबाबतची माहिती दिली. महसूल प्रशासनातील ४० वर्षांवरील सुमारे ४२७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ठाण्यातील एका नामवंत हॉस्पीटलच्या सहकार्यातून आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आरोग्य तपासणीसाठीचे पत्र देण्यात आले.

निवडणूक ओळखपत्र आधारशी लिंक करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ
यावेळी निवडणूक ओळखपत्र आधारशी लिंक करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. महसूल दिनानिमित्त जिल्हा पुरवठा अधिकारी राजी थोटे, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, तहसीलदार राजेंद्र चव्हाण, राजाराम तवटे, जयराज देशमुख, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्यासह सुमारे 66 उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी नावेकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महसूल प्रशासनातील उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आदी उपस्थित होते

Share