उदय सामंत गाडी हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून शिवसैनिकांची धरपकड

पुणे : शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर काल हल्ला करण्यात आला. पुण्याताली कात्रज चौकामध्ये शिवसैनिकांनी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ला प्रकरणी आता पुणे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी या हल्ला प्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली आहे. मोरे यांच्यासह ५ जणांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आतापर्यंत एकूण ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली. मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आलीय. सभेचे मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांनाही अटक करण्यात आलीय. त्यांच्यासह राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रूपेश पवार यांना अटक करण्यात आलीय. त्याशिवाय १५ जणांना गुन्हा दाखल करण्यात आलाय.

शिंदे गटात दाखल झालेले आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर काल कात्रज चौकात हल्ला झाला होता. याप्रकरणी शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांची पहिली अटक झाली. दरम्यान, मोरे यांनी ट्विट करत माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे, असे म्हटले आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची पुण्यात दणदणीत, खणखणीत सभा पार पडली. म्हणून सरकारने शिवसैनिकांवर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे, असे ट्विट शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी केले आहे. तसेच आमच्यावर गंभीर आरोप करुन गजानन थरकुडे, संभाजीराव थोरवे, राजेश पळसकर, सुरज लोखंडे, चंदन साळुंखे , विशाल धनवडे, अनिकेत घुले, रुपेश पवार आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यावर भारती विद्यापीठ स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिली.

काय घडलं नेमकं?

शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. उदय सामंत हे मोहमद वाडी येथील कार्यक्रम संपवून शिवसेना नेते तानाजी सावंत यांचे कात्रज येथील घराजवळ आले होते. इथल्या चौकाजवळ आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलेली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेले होते. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे उदय सामंत यांचा ताफा होता. कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांना गाडीत बघितलं त्यानंतर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. पण, पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. उदय सामंत यांना केंद्र सरकारने सुरक्षा पुरवली आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या तीन गाड्या होत्या. तसंच स्थानिक पोलिसांच्या पायलट व्हॅनही सामंत यांच्या ताफ्यात होत्या.

Share