अख्खा महाराष्ट्र बेवारस आणि मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी ; यशोमती ठाकूर यांची बोचरी टीका

अमरावती : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन १ महिना उलटला आहे. तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. याच मुद्यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. आज अख्खा महाराष्ट्र बेवारस झाला आहे, राज्यातील जनतेचं सरकार मायबाप असते, मात्र या सरकारचा अजूनही ठाव ठिकाणा नाही, अशी बोचरी टीका माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली आहे. ही टीका करतानाच पावसामुळे अमरावतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे अमरावतीत ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन एक महिना झाला आहे. असं असूनही मंत्री नेमायची हिंमत यांच्यात नाही. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी पालकमंत्री नेमले पाहिजे, संबंधित पालमंत्र्यांनी जिल्ह्यात गेलं पाहिजे. समाजकारणासाठी राजकारण असतं, केवळ सत्ता मिळवण्यासाठी राजकारण नसतं. त्यामुळे समाजकारणासाठीच राजकारण केलं पाहिजे. आज अख्खा महाराष्ट्र बेवारस पडलेला आहे. कोणतं खातं कुणाकडे आहे? याची कुणाला कल्पना नाही. असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगवेगळ्या कारणांसाठी दिल्लीत जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आम्हाला चालणार नाही अशी टीका ठाकूर यांनी केली आहे.

ओला दुष्काळ जाहीर करा

अमरावती जिल्हयामध्ये मागील आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीयशोमती ठाकूर यांनी केली आहे. तसेच शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत आणि सर्वसामान्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, अशा मागणीचे निवेदनही त्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना आज दिले.

गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हाहा:कार माजला आहे. गावा-गावात पुराचे पाणी शिरून प्रचंड नुकसान झाले. शेती पाण्याखाली गेली, घराघरात पाणी शिरले, गुरेढोरे वाहून गेली आहेत. त्यामुळे या अतिवृष्टीचा तडाखा अमरावती जिल्ह्याला बसला असून शेतीसह घर, मालमत्ता आणि पशुधनाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. याचे दूरगामी परिमाण दिसून येत असून नुकसानी संदर्भातील पंचनामे तत्काळ करून अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडे केली आहे.

Share