मुंबई : राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार हे जोवर १४५ आमदारांच्या पाठिंबा आहे तोवर चालेल, ज्यावेळी सरकारमधील आमदारांची संख्या कमी होईल तेव्हा हे सरकार गडगडेल असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. सत्ताधारी पक्ष राज्यात ४८ खासदारांपैकी ४७ खासदार निवडून आणण्याची वक्तव्ये करत आहेत. पण महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात एकाच पक्षाचे संपूर्ण खासदार कधीच निवडून आलेले नाहीत. त्यामुळे कोणीही कितीही वक्तव्ये केली तरी राज्यातील मतदार हा अत्यंत विचारी आहे हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. आगामी निवडणुकीत यासंबंधीचे चित्र मतदानानंतर स्पष्ट होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
अजित पवार म्हणाले की, राजकीय जीवनात कर्तृत्वाला जास्त महत्त्व आहे. त्याला घराणेशाही म्हणणे चुकीचे आहे. ज्यांच्यामध्ये कुवत नाही, ताकद नाही, कर्तृत्व नाही, अशांना बळजबरीने एखाद्या पदावर बसवले तर त्याला घराणेशाही म्हणू शकतो. मात्र राजकीय घरात जन्माला आलेली पुढची पिढी जर कर्तृत्ववान असेल आणि लोकशाही पद्धतीने जनतेने जर त्यांना आमदार अथवा खासदार केले तर त्याला घराणेशाही म्हणणे चुकीचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं. मुख्यमंत्री असतात त्यामुळे त्या सरकारला त्यांच्या नावानेच संबोधलं जातं. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे शिंदे सरकार म्हटलं जातं. फक्त युतीच्या काळात जोशी-मुंडे सरकार म्हटलं जात होतं. पण त्यानंतर असं म्हणायची पद्धत बंद पडली. कुणाला कोणतं खातं द्यायचं हा शिंदे यांचा अधिकार आहे. कोणतंही खातं कमी नसतं. वजनदार आणि हलकंफुलकं खातं असं काही नसतं. प्रत्येक खात्यात चांगलं काम करता येतं. माझ्याकडे तर एकेकाळी कृष्णाखोरे हे पाच जिल्ह्याचं मंत्रीपद होतं. पण मी ते स्वीकारलं आणि कामही केलं. वजनदार खातं दिलं आणि कर्तृत्वशून्य व्यक्ती बसवला तर त्या खात्याला न्याय मिळत नाही, असंही त्यांनी सांगितलं. मंत्रिमंडळात २२-२३लोकं घ्यायची आहेत. काही राज्यमंत्री येतील, काही कॅबिनेट असतील. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काही खाती आपल्याकडे ठेवली असतील, असंही त्यांनी सांगितलं.