…तेव्हा मोदी सरकारची अक्कल ठिकाणावर आली – नाना पटोले

मुंबई : भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. इस्लाम धर्माचे प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी केल्याने एकूणच मुस्लिम समूहामध्ये तीव्र असंतोषाची लाट आहे. या सर्वाचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाहायला मिळत आहे. भाजपने आता नुपूर शर्मा यांना निलंबित केले असून जिंदाल यांना बडतर्फ करण्यात आले आहे. या प्रकरणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजपावर टीका केली आहे.

नाना पटोले यांनी ट्विट म्हटलं की, “भाजपाच्या प्रवक्ता नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांची भाजपाने पक्षातून हक्कालपट्टी केली आहे. ते दोघंही समाजात धार्मिक द्वेष पसरवत होते. महाराष्ट्रातही अशाप्रकारचे काही भाजपा नेते आहेत, जे रोज धार्मिक द्वेष पसरवत आहेत.”

दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी पुढे म्हटलं की,‘सर्वप्रथम देश आणि नंतर स्वतः’ हे भाजपाला कधी समजणार देव जाणो. अमेरिका, अनेक युरोपियन देश व आखाती देशांनी भारतावर व्यापार बंदी आणली, तेव्हा मोदी सरकारची अक्कल ठिकाणावर आली. नाहीतर निवडणूक जिकंण्यासाठी हे सख्ख्या भावांमध्ये देखील भांडण लावतील.

नेमकं प्रकरण काय आहे?
भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी अलीकडेच एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान कथितपणे प्रेषित मोहम्मद यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यांच्या या टिप्पणीनंतर देशभरात पडसाद उमटले. उत्तर प्रदेशातील कानपूर याठिकाणी दोन गटात दंगल देखील उसळली. यामध्ये १२ हून अधिकजण जखमी झाले आहेत. घटनेची तातडीने दखल घेतल्याने कानपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र आता संबंधित वक्तव्याचे पडसाद जगभर उमटत आहेत. वाढता विरोध पाहून भाजपाने काल भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि दिल्ली भाजपाचे मीडिया प्रमुख नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Share