मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील बिघाडी, अपक्ष आमदारांची फुटलेली मते यामुळे शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीत तेवढा समन्वय राहिला नसल्याचे बोलले जाते. यामुळे राज्यसभेप्रमाणे भाजप एक जागा अतिरिक्त जिंकण्याची पुनरावृत्ती विधान परिषदेत करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीत कसलीही बिघाडी नाही. महाविकास आघाडी विधान परिषदेच्या ६ जागा जिंकणार, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस त्यांचा दुसरा उमेदवार मागे घेईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार रिंगणात कायम ठेवल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेची निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या प्रसार माध्यमांशी संवाद साधला. विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारांना जिंकण्यासाठी २६ मतांचा कोटा आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, अपक्ष आम्हाला मतदान करतील, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमचा दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यासाठी सांगत नव्हते तर आम्हाला मदत करण्याबाबत चर्चा करत होते. महाविकास आघाडीत कसल्याही प्रकारची बिघाडी नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व ६ उमेदवार विजयी होतील, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
हे आहेत विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार
विधान परिषदेसाठी आता १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेने सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना विधान परिषद निवडणुकीचे तिकीट दिले आहे.