पुणे : ‘आयर्नमन’ म्हणून ओळखले जाणारे पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची नुकतीच व्हीआयपी सुरक्षा विभागाच्या पोलिस महानिरीक्षकपदी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. मात्र, या बदलीवरून कृष्ण प्रकाश नाराज आहेत. कृष्ण प्रकाश यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
कृष्ण प्रकाश यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये शेरोशायरीमधून आपली भावना व्यक्त केली आहे. एका पोस्टमध्ये त्यांनी, ‘मेरे पसीने से मेरे मेहनत की खुशबू आती है! मेरा लहू मेरे रगो मैं इमान का रंग भरता है! ऐ दौर की दुश्वारिया युं न इतरा मेरे हालात पे! वक्त तो वक्त है, आता और जाता है!,’ अशी शायरी केली आहे. कृष्ण प्रकाश यांची ही इन्स्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट सध्या पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
कृष्ण प्रकाश हे वेषांतर करून कारवाई करण्यात आघाडीवर होते. गेल्या आठवड्यात गृह विभागाने बदल्यांचे आदेश काढले. यात कृष्ण प्रकाश यांची मुदतपूर्व बदली करण्यात आली. बदली झाली तेव्हा कृष्ण प्रकाश हे परदेशात होते. त्यांच्या जागी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त पदाचा तातडीने पदभार स्वीकारला आहे. या बदलीबद्दल नाराजी व्यक्त करत कृष्ण प्रकाश यांनी इन्स्टाग्रामवरून ‘वक्त आता है और जाता है’, असे म्हणत ही कठीण वेळ ही निघून जाईल, अशा आशयाची पोस्ट शेअर केली आहे.
तडकाफडकी बदली केल्याने कृष्ण प्रकाश नाराज आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नुकतीच बारामती येथे भेट घेऊन कैफियत मांडली. ठाणे येथील पाच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीला जशी स्थगिती मिळाली तशी त्यांच्या बदलीला स्थगिती मिळेल, असे कृष्ण प्रकाश यांना वाटत होते;पण शरद पवार यांच्या भेटीतूनही काही साध्य झाले नसल्याचे बोलले जात आहे. त्यातूनच कृष्ण प्रकाश आता इन्स्टाग्रामचा आधार घेऊन शायरीमधून भावना व्यक्त करताना दिसत आहेत.