उद्धव ठाकरेंच्या गालावर न्यायालयाने बारावी झापड मारली आहे : किरीट सोमय्या

मुंबई : राज्यसभेच्या उद्या १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायालयाने आज (गुरुवार) देशमुख व मलिक यांना मतदानासाठी एक दिवसाचा जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. हे तर होणारच होते, उद्धव ठाकरेंच्या गालावर न्यायालयाने बारावी झापड मारली आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

आज माध्यमांशी बोलताना भाजप नेते किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. किरीट सोमय्या म्हणाले, माफिया सरकारच्या माफिया सरदारला असे वाटतेय की, गुंडासारखे राज्य करायचे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत हे मान्य नाही. उद्धव ठाकरे यांनी दाऊदच्या एजंटला मंत्रिमंडळात ठेवले आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगितले मी ठेवणार. आता पहा काय होतेय ते, आता कळेल त्यांना. अशी माफियागिरी करणाऱ्या सरकारला न्यायालय अशाच पद्धतीने धडे शिकवत आहे आणि शिकवत राहणार आणि शेवटचा धडा महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनता शिकवणार.

संजय राऊतांनादेखील न्यायालयाने जोरदार थप्पड लगावलीय

मुंबईतील शिवडी न्यायालयाने प्रा. डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या बदनामीच्या तक्रारीची दखल घेतली आहे. या प्रकरणात संजय राऊत यांना ४ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स काढले आहे. यावरदेखील किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनता माफिया सरकारला धडा शिकवणार असून, आज न्यायालयाने संजय राऊत यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या समन्समुळे राऊतांनादेखील न्यायालयाने जोरदार थप्पड लगावली असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.

तोपर्यंत मला कोणतेही पद नको
राज्यसभेच्या जागेसाठी तुम्हाला संधी दिली गेली नाही, याबद्दल तुम्हाला खंत वाटत नाही का? असा प्रश्न विचारला असता सोमय्या म्हणाले, महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेने मला खूप मोठे काम दिले आहे. महाराष्ट्राची वाट लावणारी माफियागिरी, ५० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या लोकांना योग्य ठिकाणी पोहचवायचे आणि साडेबारा कोटी जनतेचे रक्षण करण्याचे काम सध्या माझ्याकडे आहे, ते पूर्ण होईपर्यंत मला दुसरे काही नको, असे सोमय्या यांनी यावेळी सांगितले.

Share