नागपुर : आगामी निवडणूकांसाठी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. उद्धव ठाकरे यांना सध्या युती करायला कुणी मिळत नाही. त्यामुळे शिवसेनेने संभाजी ब्रिगेडला सोबत घेतलं आहे. संभाजी ब्रिगेडने २०१९ मध्ये ४० जागांवर निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना ०.०६ टक्के मतं मिळाली होती. त्यांच्याशी परत युती करून उद्धव ठाकरे यांनी फुसका बार सोडला आहे. असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.
संभाजी ब्रिगेडने २०१९मध्ये ४० जागांवर निवडणूक लढवली. त्यांना ०.०६ टक्के मतं मिळाली. उद्धव ठाकरेंना इतकी कमी मतं मिळवणाऱ्या पार्टनरसोबत युती करावी लागतेय. महाराष्ट्रातील कोणताही पक्ष त्यांच्याशी युती करायला तयार नाही. त्यांच्यासोबतचे मित्र त्यांना सोडून पळून जातील. संभाजी ब्रिगेडसोबत जाऊन काही होणार नाही. ते महाराष्ट्राला आव आणून सांगत आहेत. पण हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत वाईट आहे, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
आदित्य ठाकरेंचं इव्हेंट मॅनेजमेंट
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असे बॅट्समन आहे की जेव्हा क्रिकेट ( निवडणूक ) सुरु होईल, तेव्हा येवढे चौकार- षटकार लागेल की महाविकास आघाडी, संभाजी ब्रिगेड गारद होईल. प्रचंड मतांनी आम्ही निवडणूकीचा सामना जिंकू. आदित्य ठाकरे यांचं सध्या इव्हेंट मॅनेजमेंट सुरू आहे. त्यांचे दौरे होण्याआधी इव्हेंट मॅनेजमेंट केलं जातंय. आदित्य ठाकरे मंत्री असताना चांगलं काम केलं असतं तर अशी वेळ आली नसती, असा चिमटाही त्यांनी काढला.
धैर्यशील कदम भाजपमध्ये
दरम्यान, कराड उत्तरचे नेते आणि वर्धन अॅग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी शिवबंधन तोडून मुंबई येथील भाजपा कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.जयकुमार गोरे, खा. रणजितसिंह निंबाळकर, आ.राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात धैर्यशील कदम यांची मोठी ताकद आहे. त्यांनी 2019ची विधानसभा निवडणुक शिवसेनेकडून लढली होती.