अनिल देशमुख जेलमध्ये चक्कर येऊन पडले; उपचारासाठी जेजे रूग्णालयात दाखल

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले आहेत. अनिल देशमुख यांचा रक्तदाब वाढल्याची माहिती मिळाली आहे. छातीत दुखत असल्यामुळे देशमुख यांना जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. सकाळी ११ वाजता ते अचानक चक्कर येऊन खाली पडले. यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. नंतर जे जे रुग्णालयात नेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. दोन दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी निलंबीत एपीआय सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिल्याचा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यानी केला होता. यासंदर्भातलं एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवलं होतं.  याप्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून सचिन वाझेला अटक करण्यात आली आहे. तसंच अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही अटक करण्यात आली आहे.

Share